चालू वर्षांत मेमध्ये आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक या खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील दोन बडय़ा बँकांनी नवीन संपर्करहित तंत्रज्ञानावर आधारित क्रेडिट व डेबीट कार्डाच्या प्रस्तुतीनंतर, खासगी क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेनेही तिच्या ग्राहकांसाठी या नवीन सुविधेचे दालन खुले केले आहे. अ‍ॅक्सिस बँकेने विविध १५ विदेशी चलनात विनिमय शक्य असलेले फॉरेक्स कार्डही संपर्करहित स्वरूपात प्रस्तुत केले असून, अशी सुविधा देणारी ती भारतातील पहिलीच बँक असल्याचा तिचा दावा आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूरसह जगात अनेक देशांमध्ये संपर्करहित तंत्रज्ञानावर आधारित कार्डद्वारे भरणा प्रणाली उपलब्ध झाली असून, विदेशात जाणाऱ्या भारतीयांना बँकेचे हे फॉरेक्स कार्ड उपयुक्त ठरेल, असा विश्वास अ‍ॅक्सिस बँकेने व्यक्त केला आहे. दुकानदाराकडे असलेल्या बिनतारी पीओएस टर्मिनल्सवर कार्ड स्वाइप न करता अथवा खाचेत न घालता, संपर्करहित कार्डद्वारे त्या टर्मिनलवर केवळ थाप देऊन, विनिमय व्यवहार पूर्ण होतो. यातून एकूण विनिमयासाठी लागणारा वेळ लक्षणीयरूपात कमी होईल.