वेतन वाढीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर जात असल्याने देशातील बँकिंग व्यवहार सलग तीन दिवस ठप्प पडणार आहे. ‘द युनायडेड फोरम ऑफ बँक यूनियन’च्या नेतृत्वाखाली १० व ११ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या संपाची हाक देण्यात आली आहे. वेतनवाढीसाठीच्या मागणीसाठी संघटनेच्या व्यासपीठाखाली १० लाखांहून अधिक बँक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार आहेत. बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’बरोबर कर्मचारी संघटनेच्या गेल्या आठवडय़ात दोनदा वेतनवाढीबाबत चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र यातून तोडगा न निघाल्याने संपाची हाक देण्यात आल्याचे संपकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. याबाबतची पुढील चर्चा १३ फेब्रुवारीला होणार असली तरी संपाची भूमिका कायम असल्याचे संघटनेने म्हटले आहे.