मागील लेखात लिहिल्यानुसार आपल्या ४,५०० हून अधिक कोअर बँकिंग यंत्रणेत असलेल्या सर्व शाखा डिमॅट सेवेसाठी सूचिबद्ध न करता काही निवडक शाखाच सूचिबद्ध करायचे कारण असे की, सेबीच्या नियमानुसार डिमॅट सेवा देणाऱ्या प्रत्येक शाखेत किमान एक कर्मचारी हा प्रशिक्षित असला पाहिजे. याचा अर्थ तो केवळ पदवीधर असला पाहिजे असा नसून एनआयएसएम म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट’ या संस्थेने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा दाखला त्याच्याकडे असला पाहिजे. दुसरे म्हणजे ‘कंप्लायन्स’संबंधी काही बाबींची पूर्तता करावी लागते. एखादा कर्मचारी अशा प्रकारे प्रशिक्षित असेल आणि त्याची बदली दुसऱ्या शाखेत झाली तर त्याच्या ऐवजी दुसरा प्रशिक्षित कर्मचारी नेमणे राहून जाण्याची शक्यता असते. बँकांच्या अवाढव्य व्यापात नेहमीच याबाबत नियंत्रण ठेवणे शक्य होईलच असे नाही, त्यामुळे कदाचित अशा सूचिबद्ध शाखांची संख्या कमी असू शकते.
आतापर्यंत मी लिहिले की बँकेच्या शाखा डिमॅट खाती उघडतात आणि मूळ कागदपत्रे शाखेतच राहतात; ती स्थिती बहुतांश बँकांमध्ये आता राहिली नाही. अनेक वेळा अनुभवातून त्यातील अडचणी आणि धोके लक्षात येतात. कल्पना करा की, एखाद्या शाखेने योग्य ते ‘केवायसी’ दस्तावेज ग्राहकाकडून घेतले नाहीत आणि जेव्हा केव्हा ऑडिट तपासणीच्या वेळी ही बाब उघड होईल तेव्हा त्याला दंड ठोठावला जाईल. त्यामुळे आजकाल बहुतांश बँका अशा प्रकारे डिमॅट खाते उघडण्याचे अधिकार शाखांना देत नाहीत तर त्यांना सांगतात की, डिमॅट खाते उघडण्याचा अर्ज ग्राहकाकडून भरून घ्या आणि त्यासोबत योग्य ती केवायसी कागदपत्रे घेऊन ते प्रमाणित करून डिमॅट कार्यालयात पाठवा. म्हणजे डिमॅट कार्यालय प्रत्यक्षात खाते उघडेल. मागील उदाहरण घ्यायचे तर, सोमवारी दुपारी तीन वाजता एखादा अर्ज ग्राहकाने भरून दिला तर तो मंगळवारी कुरिअरमार्फत कणकवलीहून रवाना होईल आणि बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईतील बँकेच्या डिमॅट कार्यालयात पोहोचेल. अर्थात योग्य वेळेत कुरिअर पोहोचले तर गुरुवारीच खाते उघडले जाऊ शकते. हे सर्व जर – तर यावर अवलंबून आहे. तात्पर्य, ज्या दिवशी कुरिअरमार्फत कागदपत्रे पोहोचली की डिमॅट खाते उघडले जाईल. अर्थात हे फक्त खाते उघडण्याच्या अर्जासाठीच लागू आहे. जेव्हा खातेदार ‘डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप’ भरून कणकवली शाखेत देईल, तेव्हा मात्र ती स्लिप कुरिअरमार्फत मुंबईस्थित डिमॅट कार्यालयात येणार नाही. कारण तितका वेळ घालवणे हे नियमात बसत नाही. टी+२ या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज चालत असल्याने कणकवली शाखेला ती स्लिप ताबडतोब पंच करणे म्हणजेच आपल्या संगणकात तपशील नोंदवून तो डेटा बॅक ऑफिस सव्र्हरमध्ये रवाना करणे गरजेचे आहे. आता संध्याकाळ झाली आहे, तेव्हा उद्या बँक उघडल्यावर त्याची ‘डेटा एंट्री’ करू असे म्हणजे ‘डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप’बाबत परवडणारे नाही. ती शाखेची जबाबदारी आहे. अनेक वेळा माझ्या व्याख्यानादरम्यान श्रोते प्रश्न विचारतात की शाखेची कनेक्टिव्हिटी तुटली असेल तर कसे होणार? याला आणखी पर्याय आहेत. संबंधित शाखेच्या जवळपास दुसरी शाखा असेल तर तिथे जाऊन डेटा एंट्री केली जाईल किंवा मुंबईस्थित डिमॅट कार्यालयात ती स्लिप फॅक्स केली जाईल किंवा त्याची स्कॅन कॉपी ई-मेलद्वारे तिथे पाठवली जाईल. (या सर्व कटकटी टाळण्यासाठी ईझीएस्ट, ट्रस्ट वगरे सोयी आहेतच, ज्याबाबत पूर्वी याच सदरातून लिहिले आहेच.) ही सर्व माहिती वाचल्यावर लक्षात आलेच असेल की डिमॅट कार्यालय जे जे काम करते, त्याची नोंद तात्काळ सीडीएसएल यंत्रणेत होत असल्यामुळे एखादे डिमॅट खाते उघडताना काही तपशील चुकीचा नोंदवला गेला असेल तर काही करता येत नाही. कारण एंटरचे बटण दाबताच डिमॅट खाते क्रमांक निर्माण झालेला असेल. मात्र हेच काम जर एखाद्या शाखेने केले असेल तर तो डेटा एक्सपोर्ट होईपर्यंतच्या वेळात डिमॅट कार्यालयातील बॅक ऑफिस सव्र्हरमध्येच पडून असेल. त्यामुळे डेटा एंट्रीमध्ये काही चूक झालेली लक्षात आल्यास त्यात दुरुस्ती करणे शक्य होते. साहजिकच वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की जर अशी चूक नंतर लक्षात आली तर काय होणार? डिमॅट खात्यातील नावात काही बदल केले जाऊ शकत नाहीत. (अपवाद फक्त विवाहानंतर नाव बदललेले असेल तर) त्यामुळे असे खाते डीपी बंद करून परत नवीन खाते उघडणार. अर्थात काही वेळा अपवादात्मक परिस्थितीत शक्य असेल तिथे सहकार्य करण्याची डिपॉझिटरीची भूमिका असतेच.
अशा प्रकारे उपलब्ध असलेल्या बँकिंग नेटवर्कचाच वापर करून तसेच शाखेत बँकिंगच्या कामासाठी वापरले जाणारे संगणकच वापरून डिमॅट सेवा दिली जाते. त्यामुळे अतिरिक्त असा काही खर्च बँक डीपीना येत नाही. विभा नेसरीकर, सुलभा हर्डीकर आणि सुधीर म्हात्रे या तिघांनीही समान प्रश्न विचारला आहे की, मग पूर्वी अस्तित्वात असलेले चेन्नई, अहमदाबाद, कोलकता वगरे ठिकाणी असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या स्वतंत्र डीपी यंत्रणेचे काय झाले? ते सर्व डीपी जे सीडीएसएलला थेट जोडले होते ते बंद केले गेले. तिथे जी काही डिमॅट खाती होती ती सर्व बंद करून तात्काळ नवीन मुंबईस्थित डिमॅट कार्यालयात नव्याने उघडली गेली. अर्थात त्या सर्व खात्यांना नवीन डिमॅट खाते क्रमांक मिळाला हे ओघानेच आले. मात्र त्यासाठी त्यांना कसलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागले नाही की नव्याने केवायसी दस्तावेज द्यावे लागले नाहीत. ग्राहकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे हे स्थित्यंतर सहजपणे झाले. या सर्व प्रक्रियेत सीडीएसएलचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रमोद देशपांडे हे होते आणि योगायोगाची बाब म्हणजे देशपांडे हे पूर्वी बँक ऑफ इंडियाच्या सेवेत होते, जिथून ते सीडीएसएलमध्ये दाखल झाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
डिमॅट कार्यालयातील कामाची नोंद तात्काळ डिपॉझिटरीच्या यंत्रणेत होते
मागील लेखात लिहिल्यानुसार आपल्या ४,५०० हून अधिक कोअर बँकिंग यंत्रणेत असलेल्या सर्व शाखा डिमॅट सेवेसाठी सूचिबद्ध न करता काही निवडक शाखाच सूचिबद्ध करायचे कारण असे की
First published on: 07-02-2014 at 04:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank office system dmat office work record