ऑक्टोबरमध्ये ७ महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी

देशाच्या निर्मिती क्षेत्राने मरगळ झटकून सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात लक्षणीय सक्रियता दाखविल्याचे मासिक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. उत्पादकांनी एकंदर कार्यसंचालनाच्या स्थितीत चालू वर्षात फेब्रुवारीनंतरची सशक्त सुधारणा दर्शविली असून, व्यावसायिक आशावाद सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर नोंदला गेला आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या निक्केई मार्किट इंडियाद्वारे सर्वेक्षणावर बेतलेला, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ५५.९ गुणांवर पोहोचला आहे. आधीच्या सप्टेंबरमध्ये त्याची पातळी ५३.७ गुण अशी होती. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

नव्याने आलेला कामांचा ओघ वाढल्याने ऑक्टोबर महिन्यांत उत्पादनात वाढ नोंदण्यात आली. सलग चौथ्या महिन्यात निर्मिती क्षेत्राशी संलग्न पीएमआय निर्देशांकात वाढ झाली आहे. ही सात महिन्यांतील सर्वात वेगवान वाढ असून आणि मार्चनंतर देशातील निर्मित उत्पादनांना असलेली मागणी यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याने कारखान्यांनी उत्पादन वेगाने वाढविले आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीला गती मिळणे सुरूच आहे. ऑक्टोबरच्या आकडेवारीने नवीन कामे, उत्पादन आणि उत्पादन घटकांच्या खरेदीमध्ये लक्षणीयरीत्या वाढ दर्शविली आहे. मागणीत अधिक सुधारणा होण्याची शक्यता असल्याने कंपन्यांनी उत्पादन घटकांचा साठा वाढविला आहे. परिणामी विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे, असे या निर्देशांकाच्या निमित्ताने माकिटच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी स्पष्ट केले.

भारतीय उत्पादित वस्तूंना जगभरात चांगला प्रतिसाद मिळाल्याने मागणी उंचावल्याचे यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिवाय निर्यात तीन महिन्यांतील सर्वात जलदगतीने वाढली आहे. व्यवसायांचा उत्साही आत्मविश्वास आणि कंपन्यांकडील नवीन प्रकल्पांमुळे येत्या काही महिन्यांत उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र देशातील रोजगार तसेच महागाईच्या स्थितीत फारसा फरक पडला नसल्याचे लिमा यांनी आवर्जून नमूद केले आहे.