समाजाच्या संपन्न वर्गातील तरुणाईत ‘कॅफे कल्चर’बद्दल वाढते आकर्षण हे चहा-कॉफीच्या बाजारपेठेसाठी विलक्षण उपकारक ठरत आहे, असे प्रतिपादन कोटक कमॉडिटीज् लिमिटेडचे अध्यक्ष सुरेश कोटक यांनी केले. देशातील बहुतांशांचे आवडते पेयाला वाहिलेल्या ‘वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पो २०१३’च्या शुक्रवारी गोरेगाव (पूर्व) येथील प्रदर्शन संकुलात झालेल्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित असलेली चहा-कॉफीच्या आधुनिक विक्री दालनांची शृंखला भारतातही बाळसे धरू लागली आहे. उच्च प्रतीच्या ब्रॅण्डेड चहाचे भारतीय समाजमनातील आकर्षण हे प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून असल्याचे कोटक यांनी पुढे बोलताना सांगितले. २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत भारतातील चहा-कॉफी विक्री दालनांमधील उलाढालीत वार्षिक सरासरी ११ टक्के दराने वाढ होऊन, एकंदर २२०० कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा आकडा गाठला जाईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
सेंटिनेल एक्झिबिशन प्रा. लि.ने या ‘वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पो’चे आयोजन केले असून ते येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. देशात कॉफीच्या चाहत्यांमध्येही उत्तरोत्तर वाढ होत असून, या बाजारपेठेची दरसाल ६ टक्के दराने वृद्धी होत असल्याचे प्रदर्शनाच्या आयोजक सेंटिनेलच्या संचालिका प्रीती कपाडिया यांनी सांगितले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी तब्बल १०० कोटींहून अधिक चाहते असलेली विशालतम बाजारपेठ हे भारताबद्दल अतुलनीय आकर्षण निश्चितच आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून गुंतवणुकीत स्वारस्यही दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टारबक्स आणि डंकिन डोनट्स यासारख्या जागतिक शृंखलांचा भारतातील प्रवेश पाहता आगामी तीन वर्षांत कॉफी चेन स्टोअरची संख्या सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढलेली दिसेल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. सोबतीला ग्रीन टी, स्वीटनर्स, शुगर फ्री उत्पादनांसारखी वाढती विक्री चहा-कॉफीच्या हव्यासाबरोबरीनेच वाढती आरोग्यविषयक दक्षताही दाखवीत असल्याचे त्यांनी सांगितले. या एक्स्पोमध्ये बाजारपेठेच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंवर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, बाजारपेठ तज्ज्ञ, यशस्वी ब्रॅण्ड्सचे प्रवर्तक चर्चा-परिसंवादाद्वारे प्रकाश टाकतील. चहा-कॉफी व्यापाऱ्यांच्या संघटना, उद्योग मंडळे, चहा उत्पादकांचे संघ, चेंबर्सचे प्रतिनिधी, धोरणकर्ते व सनदी अधिकाऱ्यांचाही यात समावेश असेल.