|| सुधीर जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची ही तेजी सर्वव्यापी असल्यामुळे या तेजीत मिडकॅपमधील जे समभाग वाढलेले नाहीत ते विकून गुंतवणूकदारांन आपला पोर्टफोलियो स्वच्छ करता येईल.

निवडणुकीतून सत्तेच्या नाडय़ा कोणाच्या ताब्यात असतील याबाबत आज स्पष्टता नसली तरीही बाजारातील सत्तेच्या नाडय़ा मंदीवाल्यांकडून तेजीवाल्यांकडे मात्र आल्या आहेत. गेल्या आठवडय़ात सुरू झालेला निवडणूकपूर्व खरेदीचा माहोल या आठवडय़ातही कायम राहिला. बाजारातील मंदीवाल्यांनी आपले सौदे गुंडाळले, तर तेजीवाल्यांनी नवीन खरेदी केली. परिणामी सोमवारपासून माहिती-तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रांतील समभागांनी दररोज उसळी घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक दिवशी तेजी राखत आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात १,३५२ अंशांची, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३९१ अंशांची घसघशीत भर पडली.

डॉलरच्या तुलनेत ६९.१४ पर्यंत रुपया मजबूत झाला आहे. वाढणाऱ्या रुपयाबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग थोडे खाली येत आहेत. इन्फोसिससारखा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल समभाग ७०० रुपयांच्या आसपास खरेदी करण्याची संधी आहे. महिन्याभरात कंपनी वार्षिक निकाल आणि लाभांश जाहीर करेल. त्या वेळी चांगल्या कामगिरीच्या अपेक्षेवर समभाग वर जाईल. कंपनीने जाहीर केलेल्या ८,२६० कोटी रुपयांच्या पुनर्खरेदीला भागधारकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्याचा भाव टिकून राहण्यास मदत होईल.

किरकोळ महागाईच्या दरात फेब्रुवारीत वाढ होऊन तो २.५७ टक्के झाला. जरी तो गेल्या चार महिन्यांतील उच्चांकावर असला तरी तो रिझव्‍‌र्ह बँकेला अपेक्षित असलेल्या पट्टय़ामध्ये आहे. जानेवारीमधील औद्योगिक उत्पादनाचा दर १.७० टक्क्य़ांपर्यंत घसरल्यामुळे एप्रिल महिन्यामधील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर आणखी ०.२५ टक्क्य़ांनी कमी केल्यास ते वित्तीय क्षेत्रास फायद्याचेच ठरेल.

पायाभूत क्षेत्रात अग्रगण्य नाव असणाऱ्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि तिच्या उपकंपन्यांना या तिमाहीत आतापर्यंत ४२,५०० कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत. निवडणुकांमुळे सरकारी कामे कमी प्रमाणात असली तरी कंपनी, या वर्षांच्या कामांमधून १०-१२ टक्के वाढीचे उद्दिष्ट मोठय़ा फरकाने पार करू शकेल. कंपनीच्या समभाग पुनर्खरेदीच्या निर्णयाला ‘सेबी’ची मान्यता अपेक्षित आहे. गेल्या महिन्याभरात १,२५० पासून १,४०० रुपयांकडे धाव घेणारा हा समभाग संधी मिळेल तेव्हा घेऊन ठेवला तर चांगला परतावा मिळू शकतो.

सध्याच्या तेजीच्या वातावरणात परदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग फार मोठा आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी महिन्यात १६,८०० कोटी रुपये, तर मार्च महिन्यात आत्तापर्यंत १४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सर्वसाधारणपणे परदेशी गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतात. त्यामुळे ही तेजी निवडणूक निकालांपर्यंत टिकून राहण्याची शक्यता वाटते. तरीसुद्धा सध्याचे निफ्टीच्या उत्सर्जनाचे (ईपीएस) बाजारभावाशी गुणोत्तर पाहिले तर बाजारातून थोडे भांडवल काढून घेण्यासारखी वेळ लवकरच येणार आहे. आता हे गुणोत्तर २७.८० पट असे आहे. नवीन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याची ही वेळ आहे.

sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse nse nifty sensex
First published on: 16-03-2019 at 00:59 IST