वायदापूर्तीला गुंतवणूकदारांची नफेखोरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी गेल्या सलग तीन सत्रातील वाढ थोपवितानाच गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात नफेखोरीचे सत्र अवलंबिले. परिणामी सर्वोच्च स्थानावर असलेला मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक गुरुवारी विक्रमी शिखरावरून खाली आला.

मुंबई निर्देशांकाने गुरुवारी शतकी घसरण नोंदवली असली तरी अद्यापही तो ३० हजाराच्या वर कायम आहे. सेन्सेक्सने गेल्या सलग तीन व्यवहारात एकूण ७६८.०५ अंश वाढ नोंदविली आहे. तर निफ्टीतील या व्यवहारा दरम्यानची भर २३२.४५ अंश राहिली आहे.

गेल्या सलग तीन सत्रातील तेजीच्या जोरावर मुंबई निर्देशांक गुरुवारी सकाळच्या व्यवहारात ३०,१८४.२२ पर्यंत झेपावला. मात्र नफेखोरीमुळे गुरुवारअखेर १०३.६१ अंश घसरणीसह सेन्सेक्स ३०,०२९.७४ वर स्थिरावला. तर ९.७० अंश घसरणीने निफ्टी ९,३४२.१५ वर थांबला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, आरोग्यनिगा, वाहन निर्देशांक घसरले. तर स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू निर्देशांकांवरही दबाव राहिला.

मार्च २०१७ अखेरचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या अ‍ॅक्सिस बँक तसेच कोटक महिंद्र बँकेच्या समभागांच्या मूल्यांचे पडसाद गुरुवारी भांडवली बाजारात उमटले. नफ्यातील मोठी घसरण नोंदविणाऱ्या अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग २ टक्क्यांसह घसरतानाच त्याचे बाजार भांडवल एकाच सत्रात २,६८१ कोटी रुपयांनी खाली आले. तर खासगी क्षेत्रातीलच कोटक महिंद्र बँकेचा समभाग गुरुवारी याच प्रमाणात उंचावला. बँकेने गेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यातील थेट ४० टक्के वाढ नोंदविली आहे.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse nse nifty sensex part
First published on: 28-04-2017 at 01:58 IST