विदेशी गुंतवणूकदारांवरील कर आणि कंपन्यांचे बरे-वाईट तिमाही निष्कर्ष यावर गेला आठवडाभर तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर प्रवास करणारा भांडवली बाजार सप्ताहअखेर चार महिन्यांच्या तळात विसावला. सेन्सेक्सने कशीबशी २७ हजाराची पातळी राखली, तर निफ्टी ८,२००च्या खाली घरंगळला.
गुरुवारी दिवसअखेर २१४.६२ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,०११.३१ पर्यंत, तर निफ्टी ५८.२५ अंश नुकसानीसह ८,१८१.५० पर्यंत थांबला. भांडवली बाजारात कामगार दिनानिमित्त शुक्रवारी व्यवहार होणार नाहीत.
एप्रिलमधील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशीही नफेखोरी साधत गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांमध्ये १७० अंशांची घसरण नोंदविण्यास भाग पाडले होते. गुरुवारी बाजाराला नकारात्मक प्रवासाकडे नेताना गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या गेल्या चार महिन्यांतील तळात आणून ठेवले.
यापूर्वी ७ जानेवारी रोजी सेन्सेक्स २६,९०८.८२ व निफ्टी ८,१०२.१० या किमान स्तरावर होते. गुरुवारी सेन्सेक्स २७ हजारांवर येऊन ठेपला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१०० राहू शकला. बाजारात विदेशी गुंतवणूकदारांवरील करांची टांगती तलवारीची तसेच कंपन्यांच्या अपेक्षेनुरूप नसलेल्या तिमाही नफ्याची चिंता कायम दिसली. सत्रात ६३.७५ पर्यंत घसरणाऱ्या रुपयानेही बाजारात धास्ती वाढविली.
सत्रात ८,२२९.४० पर्यंत झेप घेणारा निफ्टी ८,२०० चा स्तर सोडताना ८,१४४.७५ या दिवसाच्या नीचांकापर्यंत आला होता. दिवसअखेरही तो ८,२०० च्याही खालीच राहिला. तर व्यवहारात २७ हजाराखाली येताना सेन्सेक्स २६,८९७.५४ पर्यंत घसरला. व्यवहारात सुरुवातीलाच तो २७,२४२.०५ पर्यंत पोहोचू शकला.
मुंबई शेअर बाजारात वाहन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग घसरले. पोलाद निर्देशांकाला सर्वाधिक फटका बसला. तर स्थावर मालमत्ता, तेल व वायू, बँक क्षेत्रातील   समभागांचे मूल्य एकूण भांडवली  बाजारातील घसरणीतही  चमकले. सेन्सेक्समधील २३ समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex ends down nifty falls
First published on: 01-05-2015 at 02:02 IST