पुन्हा २१ हजारांपुढे मजल मारताना सेन्सेक्सने सप्ताहअखेर गेल्या चार महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी बजाविली. महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ४१९.३७ अंशांची कमाई करणारा शेअर बाजार २९ नोव्हेंबरनंतरचा उल्लेखनीय सप्ताह चढाईचा ठरला. मुंबई निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्यांच्या मागणीच्या जोरावर सेन्सेक्स १३३ अंशाने उंचावत २१,१२०.१२ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८.१५ अंशांनी सुधारत ६,२७६.९५ पर्यंत गेला.
सप्ताहअखेरच्या शेवटच्या सत्राची सुरुवात स्थिर करताना सेन्सेक्स व्यवहारात १५० अंशांची वाढ राखत होता. टीसीएस, टाटा मोटर्स, हिंदाल्को, सन फार्मा, ओएनजीसी, एलअ‍ॅण्डटी, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीजसारख्या समभागांना मागणी राहिली. ही वाढ ४.१४ टक्क्यांपर्यंतची राहिली. सलग पाचव्या व्यवहारासह सेन्सेक्समध्ये ५८३.४८ अंश भर पडली आहे. सेन्सेक्समध्ये हिंदाल्को ६.८६ टक्क्यांसह आघाडीवर होता.
शुक्रवारच्या तेजीतही रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसीसारखे १२ समभाग घसरले ते वृत्त चर्चेत राहण्यामुळेच. सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या आकडेवारीवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात व्यवहार केले. सेन्सेक्समधील १८ समभाग उंचावले, तर नऊ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. २८ नोव्हेंबर २०१३ अखेरच्या सप्ताहात सेन्सेक्सने ५७४.५४ अंश वाढ नोंदविली आहे, तर फेब्रुवारीमधील वाढ ६०६.२७ अंशांची राहिली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१३ मध्ये १,७८४.७५ अशी सर्वोच्च मासिक झेप राखली गेली आहे.

रुपयाची सवरेत्कृष्ट मासिक कमाई
गेल्या पाच आठवडय़ातील सर्वोच्च स्तरावर पोहोचताना रुपयाने शुक्रवारी चार महिन्यांतील सर्वोच्च मासिक झेपही नोंदविली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६१.७५ या जवळपास सव्वा महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, तर एकाच व्यवहारातील २३ पैशांची उडी घेत त्याने ऑक्टोबर २०१३ नंतरची सर्वात मोठी मासिक उडी नोंदविली. स्थानिक बाजारातील विदेशी निधीचा ओघ आणि जागतिक बाजारातील अमेरिकन चलनातील घसरण हे रुपया वधारण्याच्या पथ्यावर पडले. चालू सप्ताहात बुधवार वगळता रुपया वधारता राहिला आहे. तर साप्ताहिक तुलनेत तो ३७ पैशांनी भक्कम बनला आहे. एकूण फेब्रुवारीत चलन ९३ पैशांनी उंचावले आहे.