देशात रिझव्‍‌र्ह बँकेकडून (उद्या) शुक्रवारी, तर विदेशात युरोपियन मध्यवर्ती बँकेकडून गुरुवारी भारतीय भांडवली बाजार बंद झाल्यावर सायंकाळी उशिराने व्याजदरात कपातीची घोषणा होईल, या गुंतवणूकदारांच्या अपेक्षेने शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांना तीन महिन्यांच्या उच्चांकावर चढविणारी कामगिरी बजावली. व्याजदरात कपातीचे लाभार्थी ठरणारे वाहन उद्योग, बँकिग, स्थावर मालमत्ता, पायाभूत क्षेत्रात वित्तसंस्थांनी केलेल्या मोठय़ा खरेदीच्या परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ने आज ६,०००चा टप्पा पार केला.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून उद्या जाहीर होत असलेल्या वार्षिक पतधोरण आढाव्यात सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देणारे उदार धोरण जाहीर होईल आणि रेपो दरात किमान पाव टक्क्यांची कपात निश्चित असल्याचे मानून बाजारात खरेदीला गेल्या आठवडय़ाभरापासून जोर चढला आहे. गेल्या तीन दिवसात ‘सेन्सेक्स’ने त्यापोटी ४४९.०५ अंशांची कमाई केली आहे. आज याच अपेक्षारूप खरेदीला अरिष्टग्रस्त युरोपासाठी आवश्यक असलेल्या युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या (ईसीबी) संभाव्य पाव टक्क्यांच्या व्याजदर कपातीनेही बळ दिले. परिणामी ‘सेन्सेक्स’ या निर्देशांकाने पुन्हा तीन महिन्यांपूर्वीच्या १९,७३५ या उच्चांकी स्तराला गवसणी घातली, तर ‘निफ्टी’ने भावनिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ६,००० चा कळस ओलांडला. चालू वर्षांत ४ फेब्रुवारीनंतर प्रथमच निफ्टी या महत्त्वाच्या पातळीला पोहचला आहे. दिवसअखेर निफ्टीने ६९.१५ अंशांची कमाई करून, ६०००च्या उंबरठय़ावर म्हणजे ५९९९.३५ या पातळीवर विश्राम घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे आजच्या सत्रात देशांतर्गत वित्तसंस्था आक्रमकपणे खरेदी करताना दिसून आल्या, तर विदेशी वित्तसंस्थांनी ‘ईसीबी’च्या सायंकाळी उशिराने जाहीर होणाऱ्या ऋणनीतीकडे पाहता सावध पवित्रा घेतलेला दिसून आले.
आजच्या सत्रात, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टीसीएस, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, सन फार्मा, इन्फोसिस हे सेन्सेक्समधील सर्वाधिक कमाई करणारे समभाग ठरले. बँकांपैकी स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचा प्रत्येकी दीड टक्क्यांनी भाव वधारला. तर गेल्या काही दिवसांपासून चांगली वित्तीय कामगिरी तसेच अलीकडच्या काळातील सर्वात मोठी प्रवर्तकांची फेरखरेदीने प्रकाशझोतात असलेला हिंदुस्तान युनिलीव्हरचा समभाग आज नरमलेला दिसून आला. त्यासह गेल, हिंडाल्को, भेल आणि वाईट तिमाही कामगिरी जाहीर करणारी भारती एअरटेल आदी रोडावलेले समभाग आहेत.
रुपया किंचित नरमला, सोने उतरले!
गेल्या दोन दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत सशक्त होत रुपया आज काहीसा नरमला. दिवसअखेर एका पैशाची तूट दर्शवीत तो प्रति डॉलर ५३.८१ वर स्थिरावला. बरोबरीने मौल्यवान धातू सोन्यानेही गुरुवारी प्रति १० ग्रॅम २८५ रुपयांनी आपटी घेतली आणि भाव ्नरु. २७,००० खाली रोडावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nse nifty soar to 3 month high on rbi rate cut hopes
First published on: 03-05-2013 at 01:30 IST