राज्यसभेत सादर होणारे थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढ प्रस्तावाचे विमा विधेयक तसेच सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या जानेवारीतील औद्योगिक उत्पादन व फेब्रुवारीमधील महागाई दराच्या आकडेवारीवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी गेल्या सलग तीन व्यवहारातील भांडवली बाजारातील घसरणीला अखेर गुरुवारी पायबंद घातला. २७१.२४ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,९३०.४१ वर, तर ७६.०५ अंश वाढीसह निफ्टी ८७७६ वर पोहोचला.
महिन्यातील तळातून बाहेर येताना सेन्सेक्सने पुन्हा एकदा २९ हजारानजीकचा, तर निफ्टी ८७००पुढील प्रवास यारूपाने नोंदविला आहे. सत्रात सेन्सेक्स २९,९७१.०५ तर निफ्टी ८७८७.२० पर्यंत झेपावला.
अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या धास्तीवर मुंबई शेअर बाजार गेल्या सलग तीन व्यवहारांत ७९० अंशांनी (-२.७%) खाली आला. गुरुवारी मात्र बाजारात तेजीचे वातावरण सुरुवातीपासूनच होते. कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधानांसह प्रसिद्ध उद्योगपतींचे नाव आल्यानंतरही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाच्या वाढत्या विकासाबाबत साशंकता व्यक्त करूनही बाजारात खरेदीचे वातावरण राहिले.
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीतील औद्योगिक उत्पादन व महागाई दर गुरुवारी सायंकाळी अपेक्षित असताना तत्पूर्वीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासूनच खरेदीचा जोर ठेवला. तर राज्यसभेत सादर होणाऱ्या विमा विधेयकाच्या मंजुरीबाबतही खरेदीदार गुरुवारी आश्वस्त होताना दिसले. लोकसभेत पारित झालेल्या विमा विधेयकानुसार या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा सध्याच्या २६ टक्क्य़ांवरून ४९ टक्के करण्यात येणार आहे.
परिणामी विमा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनाही मागणी नोंदली गेली. त्याचबरोबर सेन्सेक्समधील सेसा स्टरलाइट, एनटीपीसी, हिंदाल्को, सन फार्मा, भेल, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, गेल यांचेही समभाग उंचावले. प्रमुख मुंबई निर्देशांकातील केवळ ६ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. तर क्षेत्रीय निर्देशांकामध्ये ऊर्जा सर्वाधिक १.५३ टक्क्य़ांनी वाढला.
विमा व्यवसायाशी संलग्न समभाग तेजीत..
रिलायन्स कॅपिटल    रु. ४८९.९५     +१०.९२%
मॅक्स इंडिया    रु. ४८८.२०     +५.४९%
आदित्य बिर्ला नुवो    रु. १६७०.४५     +३.६२%
बजाज फिनसव्‍‌र्ह    रु. १४८०.१०     +१.७४%