गेल्या सलग आठ व्यवहारातील तेजीमुळे वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात बुधवारी शेवटच्या अध्र्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे निर्देशांकातील तेजीला खीळ बसली. २८ हजारानजीक पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये ७४.७० अंश घसरण नोंदली जाऊन तो दिवसअखेर २७,७२९.६७ वर थांबला. तर २०.७० अंश घसरणीमुळे निफ्टी ८,३६०.८५ पर्यंत खाली आला. व्यवहारात त्याने गाठलेला ८,४०० चा टप्पाही दिवसअखेरही मागे पडला.
युरो झोनच्या अर्थ संकटातील ग्रीसला सहकार्याचा हात देण्यास धनको वित्तसंस्थांनी दर्शविलेल्या असमर्थतेवर चिंतेतून गुंतवणूकदारांनी निर्देशांकांना तेजीपासून दूर नेले. सेन्सेक्स व्यवहारात त्याच्या वरच्या टप्प्यापासून २०० अंशांनी ढळला.
शेवटच्या व्यवहारात विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक  बाजारात ३७४.९७ कोटी रुपयांचे समभाग विकले. ग्रीसमधील घडामोडींमुळे युरोपातील प्रमुख निर्देशांकही अध्र्या टक्क्य़ांपर्यंत घसरते राहिले. पण आधी  व्यवहार आटोपलेल्या अन्य आशियाई बाजारात तेजी होती. बाजारात सकाळच्या सत्रापासूनच तेजीचे वातावरण होते. त्यामुळे दिवसअखेर भेल, यूनिलिव्हर, ल्युपिन, सन फार्मा, विप्रो, आयसीआयसीआय बँक यांचे मूल्य वाढलेले दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex snaps 8 day winning streak europe slides on greece
First published on: 25-06-2015 at 01:43 IST