अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण बैठकीवर नजर ठेवत येथील गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला २७ हजारापार नेऊन ठेवले. २१७.३५ अंश वधारणेसह मुंबई निर्देशांक २७,०९८.१७ या गेल्या पाच आठवडय़ांच्या उच्चांकाला पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२.८५ अंश वाढीमुळे निर्देशांक ८.०९०.४५ पर्यंत गेला. प्रमुख निर्देशांक आता २२ सप्टेंबरनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.
अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्हची बैठक भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीतील निर्णय गुरुवापर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या घडामोडींवर येथील बाजारात बुधवारचेही व्यवहार झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे सावरत असलेले दर तसेच स्थानिक कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे फायद्यातील वित्तीय निष्कर्ष यावरही बाजार वरचे झोके घेत आहे.
मंगळवारीही सेन्सेक्स १२८ अंशांनी वधारला होता. तत्पूर्वी गेल्या सलग पाच व्यवहारांतील तेजी मुंबई निर्देशांकाने सप्ताहारंभी मोडीत काढली होती. भांडवली बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदली गेली. असे करताना मुंबई शेअर बाजारात पोलाद, वाहन, बांधकाम, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील समभाग अधिक चमकले. तर औषध निर्मिती, बँक क्षेत्रात नफेखोरी अनुभवली गेली.
व्यवहारात २६,९७१.१६चा नीचांक नोंदविल्यानंतर सेन्सेक्स दिवसभरात २७,१२६.३० पर्यंत झेपावला. दिवसअखेर मात्र मुंबई निर्देशांकाला २७ हजारांवर राहण्यात यश आले. गेल्या आठपैकी सात व्यवहारांमध्ये सेन्सेक्सने १,१९६.९८ अंश भर राखली आहे. तर निफ्टीने गुरुवारी ८,१०० नजीकचा प्रवास अनुभवला. गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस आहे.
रुपयाच्या घसरणीची हॅट्ट्रिक
सलग तिसऱ्या सत्रातील घसरणीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास आता आठवडय़ाच्या तळात येऊन विसावला आहे. गुरुवारी रुपया तीन पैशांनी घसरत ६१.३५ पर्यंत खाली आला. गेल्या सलग तीन व्यवहारात रुपया आठ पैशांनी रोडावला आहे. आठवडय़ापूर्वी, २२ ऑक्टोबर रोजी स्थानिक चलन ६१.२७ या वरच्या टप्प्यावर होते. रुपया आता २० ऑक्टोबरच्या ६१.३६ नजीक आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह पतधोरण बैठकीची उत्सुकता चलन व्यासपीठावरही नोंदविली जात आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex soars 217 pts to 5 wk high ahead of us fed meet outcome
First published on: 30-10-2014 at 01:06 IST