विदेशी गुंतवणूकदारांवरील करविषयक अनिश्चितता भांडवली बाजारात  गुरुवारी पुन्हा घसरणीला कारण ठरली. सलग पाच व्यवहारानंतर बुधवारी निर्देशांकांत भर घालणाऱ्या बाजारात, वरच्या स्तरावर नफेखोरी अवलंबिली गेल्याचे चित्र दिसले.
दिवसात २८ हजाराचा पल्ला गाठल्यानंतर, अखेर १५५.११ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७३५.०२ वर, तर ३१.४० अंश घसरणीसह निफ्टी ८,३९८.३० वर स्थिरावला.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांवरील पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या ४०,००० कोटी रुपयांच्या कराबाबतची अनिश्चितता सरकार व गुंतवणूकदारांच्या बैठकीनंतरही कायम आहे. याचे विपरीत सावट गुरुवारी बाजारात उमटले. यंदा सरासरीपेक्षा कमी मान्सूनच्या अंदाजाने रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे व्याजदर कपातीची आशाही मावळल्याचे मानून गुंतवणूकदारांनी व्यवहाराच्या शेवटच्या दीड तासात बाजारावर दबाव निर्माण केला.e04असे करताना त्यांनी दरम्यान सेन्सेक्सला त्याच्या २८ हजारांवरही नेऊन ठेवले होते, तर २७,६२१.१८ हा सत्राचा तळही दाखविला. शुक्रवारी जाहीर होणाऱ्या इन्फोसिसच्या तिमाही निकालांवरही गुंतवणूकदारांची व्यवहार करताना नजर कायम होती. बाजाराने गेल्या सातपैकी पाचही व्यवहारात कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबत नाराजी व्यक्त करत विक्रीचे धोरण अनुसरले होते.
सेन्सेक्समध्ये सन फार्मा सर्वाधिक २.५५ टक्क्य़ांसह घसरला, तर स्टेट बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी, महिंद्र अ‍ॅण्ड मिहद्र, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज्, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, विप्रो, रिलायन्स यांनीही घसरणीत वाटा राखला. टाटा स्टील ५ टक्के वाढीसह  बंद झाला. तथापि अन्य कंपन्यांच्या समभागातील घसरणीने  पोलाद निर्देशांकाला खाली आणले.

रुपयाची ५० पैशांची आपटी
मुंबई: एकाच व्यवहारात पैशांची अर्धशतकी आपटी घेणारा रुपया गुरुवारी गेल्या तिमाहीच्या तळात विसावला. करचिंतेने भांडवली बाजारातून काढता पाय घेणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांकडून अचानक डॉलरची मागणी वाढल्याने रुपया गुरुवारी ५० पैशांनी घसरत ६३.३२ पर्यंत खाली आला. २०१५ च्या सुरुवातीचा स्तर रुपयाने गुरुवारी गाठला. ६ जानेवारी रोजी तो ६३.५७ वर होता. गुरुवारी ६२.९५ या भक्कमतेसह सुरुवात करणाऱ्या रुपयाचे व्यवहार सत्रात ६३.३४ पर्यंत आपटले. चलनाचा बुधवारचा प्रवास ६३ नजीक पोहोचला होताच.

मौल्यवान धातू मागणी रोडावली
मुंबई : साठवणूकदार आणि दागिने व्यावसायिकांकडून असलेली मागणी रोडावल्याने गुरुवारी मौल्यवान धातूचे दर घसरले. सोन्याचा तोळ्याचा दर ८० रुपयांनी कमी होत स्टॅण्डर्ड दर्जासाठी २६,६९५ रुपयांवर आला. तर याच वजनासाठीचा शुद्ध सोन्याचा भावही त्याच प्रमाणात कमी होत २६,८४५ रुपयांवर स्थिरावला. किलोमागे चांदीचा दर १५० रुपयांनी कमी होत पांढरा धातू अखेर ३७ हजारांचा टप्पा सोडत ३६,८५० रुपयांवर थांबला.