बहुचर्चित नवी मुंबई विमानतळ हा जगातील सर्वात मोठा विमानतळ (ग्रिनफिल्ड) असेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केले. या विमानतळासाठी अखेर निविदा काढण्यात आल्याने पहिला टप्पा पार पडला.
नोव्हेंबर २००० मध्ये केंद्र सरकारच्या समितीने नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत तत्त्वत: मान्यता दिली होती. तेव्हापासून हा विमानतळ चर्चेत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने या विमानतळाच्या आड येणाऱ्या साऱ्या परवानग्या मिळण्याचा मार्ग मोकळा. पर्यावरण विषयक परवानगी मिळाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. या नियोजित विमानतळाकरिता अर्हता, विनंती प्रस्तावासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात आली आहे. निविदा सादर करण्याकरिता सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात येईल.
सहा गावांचा भूसंपादनास विरोध असला तरी बाकीच्या १२ गावांमधील रहिवाशांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर सिडकोने भर दिला आहे. निदान या सुविधा बघितल्यावर अन्य गावांमधील रहिवाशी तयार होतील, असा सरकारला विश्वास आहे. सुमारे १० हजार कोटींच्या विमानतळासाठी देशातील आघाडीच्या कंपन्या इच्छुक आहेत.