चिप-टंचाईच्या विघ्नाने संपूर्ण उद्योगावर संक्रात

आयात होणाऱ्या सुट्या घटकांची महागाई आणि उत्सर्जनविषयक कठोर बनलेल्या निर्बंधांनी वाहनाच्या किमती सणांच्या तोंडावर वाढविणे वाहन निर्मात्यांना भाग ठरले आहे. त्यातच वर्षातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या चालू हंगामात, सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेने वाहन उद्योगाला उत्पादन कमी करणे किंवा ते थांबविण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. मागणीप्रमाणे वाहनांचा पुरवठा हेच मोठे आव्हान असताना, यंदा विक्रीप्रोत्साहक सूट-सवलतींविना वाहन उद्योग सणोत्सवाला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.

वाहन निर्मात्यांकडून संभाव्य उत्पादन कपात आणि पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याचा मोठा फटका वाहन विक्रीला बसू शकेल, अशी भीती वाहन विक्रेत्यांचा महासंघ – ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन – फाडा’ने वर्तविली आहे. या कारणामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात सवलतीच्या योजनादेखील नाहीत. वाहन खरेदीसाठी सणांचा मुहूर्तापर्यंत वाट पाहण्याचे ठरविलेल्या खरेदीदारांचा यातून निश्चितच हिरमोड होण्याची शक्यता आहे

लोकप्रिय वाहनांना मागणी असताना देखील बाजारात वाहनांसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘गेल्या वर्षी ग्राहकांची मागणी नव्हती तर आता मागणीप्रमाणे वाहनांचा पुरवठा करणे हे मोठे आव्हान बनले आहे,’ असे ‘फाडा’चे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले.

मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये वाहन निर्मिती ६० टक्क्यांनी घटण्याचे संकेत दिले आहेत, तर महिंद्र अँड महिंद्रने आठवडाभर वाहन उत्पादन बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रत्येक वितरक सणासुदीच्या पाश्र्वाभूमीवर विक्री वाढण्याच्या अपेक्षेने नियोजन करतो. मात्र यंदा चित्र वेगळेच आहे. चिपचा तुटवडा, कंटेनरची कमतरता आणि धातूच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांना पहिल्यांदा सणासुदीच्या काळात त्यांच्या आवडीचे वाहन आणि वाहन खरेदीसाठी आकर्षक योजनांची वानवा दिसत आहे, असेही गुलाटी म्हणाले. शिवाय वाहनांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. मारुती सुझुकीने चालू वर्षात तिसऱ्यांदा वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे.

दुचाकी घेणारा वर्ग देखील सध्या दुचाकी खरेदीपासून दोन हात दूर राहात पैशांची बचत करण्यावर भर देत आहे. यामुळे दुचाकीसाठी कमी झालेली मागणी कंपनी आणि वितरकांपुढील चिंतेचा विषय ठरली आहे. करोना निर्बंधांमुळे शैक्षणिक संस्था सुरू झालेल्या नाहीत. मात्र आता सरकारकडून शैक्षणिक संस्था खुल्या करण्याबाबत पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या काही महिन्यांत दुचाकींच्या मागणीमध्ये वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे, असेही गुलाटी म्हणाले.