शहरीकरणाचा वाढता पसारा रोजगारातही भर घालतो आहे. त्यामुळे अशा मोठय़ा शहरांमध्ये येत्या वर्षांत रोजगाराच्या ४ ते ५ लाख संधी असल्याचा अहवाल जागतिक मालमत्ता सल्लागार संस्थेने दिला आहे.
‘सीबीआरई’च्या म्हणण्यानुसार, देशातील महानगरांमध्ये मोठय़ा प्रमाणात विशेषत: वाणिज्यिक वापराच्या जागा उपलब्ध होत आहेत. त्यासाठीच्या बांधकाम, कार्यालयीन जागेच्या निमित्ताने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
२०१५ अखेपर्यंत लागणाऱ्या एकूण मनुष्यबळापैकी निम्मा हिस्सा नवी दिल्ली, बंगळुरुसारख्या महानगरांचा असेल, असे ‘सीबीआरई’च्या दक्षिण आशियाई विभााचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंशुमन मॅगझिन यांनी म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षांत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनही ६ टक्के होईल, या आशेवर याबाबतच्या अहवालात एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह कंपन्यांमधील भरतीप्रक्रियाही वेग धरेल, असेही नमूद करण्यात आले आहे. अहवालासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात वर्षभरात नव्या कार्यालयासाठीची जागा ७ ते ८ लाख चौरस फूट होईल. ही जागा प्रामुख्याने नवी दिल्ली व परिसर, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकतासारख्या शहरांमध्ये असेल.
क्षेत्रनिहाय अंदाज बांधताना माहिती तंत्रज्ञान व निगडित सेवा क्षेत्रात उमेदवारांना अधिक संधी असल्याचे सांगितले गेले आहे. पाठोपाठ बँक, विमासारख्या वित्तीय क्षेत्रातही कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
तुलनेने औषध, अभियांत्रिकी, निर्मिती आणि दूरसंचार क्षेत्रात कमी प्रमाणात संधी असेल. मुंबई महानगरसह नवी दिल्ली-परिसर, बंगळुरु भागात देशातील एकूण प्रमुख शहरांच्या तुलनेत ७५ टक्के जागा ही वाणिज्यिक वापरासाठी असेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही कंपन्यांकडून भारतासाठीची जागेची मागणी गेल्या वर्षीच्या तलनेत यंदा दुपटीने वाढली आहे. याबाबत जागतिक कंपन्यांनी त्यांचे लक्ष यंदा चीनकडून भारताकडे वळविले आहे.
भारताच्या शहरातील जागेच्या मागणीसाठी त्या शहरातील आर्थिक विकास हे एक सबळ कारण दिले जाते. त्याचबरोबर पायाभूत सेवा क्षेत्राचा विस्तार व व्यवहारातील पारदर्शकता हेही निमित्त दिले जाते.
२०१४ मध्ये भरती कल वाढला
‘नोकरी जॉबस्पीक’च्या सर्वेक्षणानुसार, गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत, म्हणजे जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये नोकरभरतीचा कल लक्षणीय वाढला आहे. सर्व आघाडीच्या क्षेत्रात या तिमाहींमध्ये सरासरी महिना १,४७५ कर्मचारी भरती झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. व्यवसाय क्षेत्रांमध्ये विपणन, माहिती तंत्रज्ञान, वित्त, मनुष्यबळ क्षेत्रात तर शहरांमध्ये कोलकता, पुणे, हैदराबाद, बंगळुरुमध्ये भरती वाढल्याचे दिसून आले आहे.