मुंबई : डेनिम कापडाच्या निर्मितीत कार्यरत, चिरीपाल समूहातील कंपनी विशाल फॅब्रिक्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षांत निर्यात बाजारपेठेच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करताना, त्यात सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढ साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगभरात चीनबाबत वाढत्या नकारात्मकतेकडे डेनिमच्या निर्यात बाजारपेठेत जम बसविण्याची संधी म्हणून पाहत आहे.

गुरुवारीच विशाल फॅब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतलेले विनय थडानी यांनी कंपनीची सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांतील १,५४७ कोटी रुपयांच्या म्हणजेच आधीच्या वर्षांच्या तुलनेत ६० टक्क्यांच्या वाढीची कामगिरी जाहीर केली. कंपनीचा या वर्षांतील एकत्रित निव्वळ नफाही तब्बल २८१ टक्क्यांनी वाढल्याचे थडानी यांनी सांगितले. कच्चा मालाच्या किमती वाढीला साजेशी तयार उत्पादनाच्या किमतीतील वाढ आणि उत्पादन सुविधांचा संपूर्ण क्षमतेने वापर यामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीच्या महसुलात सध्या देशांतर्गत विक्रीचा बोलबोला असून, निर्यातीचा वाटा अवघा ८-९ टक्के आहे. तथापि, बदलती आंतरराष्ट्रीय स्थिती पाहता, २०२२-२३ मध्ये तो दुपटीने वाढून १५-१६ टक्क्यांवर जाईल आणि त्यानंतरच्या वर्षांत कंपनीच्या महसुलात देशांतर्गत विक्री व निर्यातीचा वाटा ७५ : २५ असा असेल, असे थडानी यांनी सांगितले. निर्यात बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यमान उत्पादन क्षमता ८ कोटी मीटरवरून १० कोटी मीटपर्यंत चालू तिमाहीअखेपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षांअखेर, १,८०० कोटींच्या महसुलाचे आणि संपूर्ण कर्जमुक्त बनण्याचे कंपनीने उद्दिष्ट राखले आहे. कंपनीवर सध्या ३० कोटींच्या घरात कर्ज आहे.