२०२० -२१ मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली आहे. तसंच कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच देशाची नवीन शिक्षण योजना जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रातही परदेशी गुंतवणूकीला (एफडीआय) मंजुरी देण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

तसंच पीपीपी मॉडेलद्वारे मेडिकल कॉलेजेस सुरू करण्यात येणार असून उच्च शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. भारताला उच्च शिक्षणाचा हब बनवणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. ब्रिज कोर्सेसच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्याशिवाय विदेशातील नोकरीसाठी नर्स, शिक्षक तयार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

स्टडी इन इंडिया आता हे नवीन मिशन असणार असून मार्च २०२१ पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी १५० नव्या संस्था निर्माण करणार असून रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.