घरातील लहानग्यांबरोबर घालविला जाणारा वेळ अनेकांसाठी त्या दिवसांतील सर्वात आनंदी क्षण असतो. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी मुला-मुलीला वेळ देणे हे प्रत्येक पालकाला वाटत असते. आपले सर्वाचेच जीवन आपल्या लहानग्यांभोवतीच रुंजी घालत असते. त्यांची काळजी, निगा हेच आपले सर्वात मोठे सुख असते.

जर आपल्या लेखी मुलांचा आनंद इतका महत्त्वाचा असेल तर त्यांच्या भवितव्यासाठी आर्थिक नियोजन नशिबाच्या हवाल्यावर आपण सोडून देऊ? उत्तर नक्कीच नाही हेच असणार! निल्सनने ‘लाइफ २०१५’ नावाचे एक सर्वेक्षण केले होते, त्यात मुलांचे उज्ज्वल भवितव्य हेच आयुर्विम्याच्या खरेदीचे पालकांसाठी सर्वात मोठे उत्तेजन असल्याचे आढळून आले आहे. या मानवविज्ञानावर आधारित ग्राहक सर्वेक्षणातून, मुलांसाठी विमा विभागामध्ये जागरूकतेचा स्तर ९९ टक्के इतका उमदा असल्याचे आढळून आले. तथापि उक्ती आणि कृतीत फरक असतोच. परंतु जागरूकतेच्या स्तराच्या तुलनेत केवळ १६ टक्क्यांनी प्रत्यक्ष विमा खरेदी केल्याचे आणि त्या उपर फक्त १२ टक्क्यांचा खरेदीचा मानस असल्याचे दिसणे खूपच निराशादायी निश्चितच म्हणता येईल.

वित्तीय बाजारात गुंतवणुकीचे अनेकविध पर्याय उपलब्ध असताना, बाल विम्याबाबत लोकांमध्ये इतके स्वारस्य असणे यामागे काही निश्चित कारणे आहेत काय? मुलाचे शिक्षण आणि त्याला त्याच्या पायावर उभे करणे यासारख्या लांबच्या उद्दिष्टांसाठी आयुर्विमा हे सर्वाधिक भरवशाचे साधन असल्याचे लोकांना पटल्याचे एक सामाईक कारण नक्कीच आहे. विशेषत: पालक-मुले नातेसंबंधातील अनेक प्रकारच्या काळजी-चिंतांची दखल घेणारे आयुर्विमा हेच आदर्श वित्तीय उत्पादन आहे, कसे ते पाहू या.

मुलांचे उच्चशिक्षण, त्यांची लग्नं, त्याच्यासह आपली वित्तीय सुरक्षितता हे जीवनातील असे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यासाठी गाठीला काही ना काही बांधून ठेवण्याला अर्थात बचतीसाठी आपल्या प्रेरित केले जाते. जीवनमानाचा खर्च ज्या गतीने वाढत चालला आहे, साधी बचत करून भागणार नाही तर मुलांबाबत आपल्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी गुंतवणुकीचीही त्याला जोड मिळायला हवी. विम्याचे ‘चाइल्ड प्लान्स’ हे मुलांच्या भवितव्याची काळजी घेतातच, शिवाय वित्तीय सुरक्षितताही प्रदान करतात. कमावत्या पालकांवर अकस्मात दुर्दैवी प्रसंग गुदरल्यास हमी दिलेली विमा राशी ताबडतोबीने मिळते. शिवाय अशा प्लान्समध्ये त्या पुढचे विमा हप्ते भरण्यापासून मोकळीक मिळून, विमा कवच मुदतपूर्तीपर्यंत कायम राहते. त्यामुळे ज्या मूळ कारणासाठी पॉलिसी घेतली गेली त्याच्याशी कोणतीही तडजोड होत नाही, अर्थात मुलाचे शिक्षण, लग्न, त्याचे वित्तीय संरक्षण हे सर्व अपेक्षित उद्दिष्टे साध्य होतात.

मुलांच्या भवितव्यासाठी अर्थनियोजन हे इतकेच काय? दीर्घ पल्ल्याच्या उद्दिष्टासाठी मोठी पुंजी उभारावयाची झाल्यास, जितक्या लवकर थोडीथोडकी का होईना बचत सुरू करता येईल तशी सुरुवात केली पाहिजे. ही थोडीथोडकी परंतु नियमित बचत मोठय़ा कालावधीत मोठी संपत्ती निर्माण करू शकते. चक्रवाढ गतीने व्याज वाढत जात दीर्घावधीत मोठा कोश तयार होतो. तथापि बाल विम्याची खरेदी करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.

  • पुंजी निर्माण करण्यासाठी उपलब्ध कालावधी.
  • कोणत्या वयात किती रकमेची गरज भासेल याचा अंदाज
  • अपेक्षित पुंजी निर्माण करण्यासाठी नियमित गुंतवावी लागणारी रक्कम

शिक्षणाचा खर्च उत्तरोत्तर वाढत चालला आहे आणि उच्चशिक्षणात तर शुल्कवाढीचा दर प्रचंड आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विशेष व्यावसायिक अभ्यासक्रमाशिवाय तरणोपाय नाही आणि त्यांची शुल्करचना ही सर्वच पालकांना परवडेल अशी निश्चित नाही. त्यामुळे निश्चित केलेले उद्दिष्ट हे वाढत जाणाऱ्या शिक्षणशुल्काचा खर्च लक्षात घेता आपल्या आवाक्यातील असेल याचा पूर्वअंदाज खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे मग खूप आधीपासून बचत सुरू करता येईल. तरी मुलाच्या उच्चशिक्षणात प्रत्यक्ष प्रवेशाची वेळ येईल तेव्हा जमा केलेला निधी काहीसा कमी पडण्याची शक्यताही आहे. परंतु ही तफावत आजकाल सहज उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कर्ज सुविधेतून पूर्ण करता येईल. तथापि पूर्णत: कर्जावर विसंबून चालणार नाही. पालकांवर कोणता अनावस्था प्रसंग गुदरल्यास हे कर्ज कुटुंबीयांची कोंडी करणारा अतिरिक्त भार ठरेल. अशा समयी बाल आयुर्विमा स्वप्नपूर्तीचे मोठे साधन ठरते.

एक पालक या नात्याने मुलांसाठी जितके काही शक्य होईल, ते करण्याचा आपला प्रयत्न असतो. पण मुलांचा चेहऱ्यावरील आनंद तुम्ही असला नसलात तरी सदा टिकून राहील, याची खातरजमा करायची असल्यास बाल विमा हाच तुमच्या आर्थिक नियोजनाचा सर्वात घटक बनायला हवा.

सचिन सक्सेना

(लेखक मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि उत्पादन विभागाचे प्रमुख)