गुंतवणूकदारांचे थकलेले रु.५६०० कोटी चुकते करण्याला प्राधान्य!
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) या बाजारमंचावरील सौद्यांमध्ये गुंतवणूकदारांचे थकलेले ५६०० कोटी रुपये परत मिळवून देता यावेत, यासाठी या प्रकरणी चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या वायदे बाजार नियंत्रक ‘फॉरवर्ड मार्केट्स कमिशन’ला अतिरिक्त अधिकार बहाल करणारी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.
परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर गेलेली नाही आणि एनएसईएलवरील सौद्यांची पूर्तता होऊन संलग्न गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा यासाठी एफएमसीला काही अतिरिक्त अधिकार बहाल केले गेले आहेत, अशी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री के. व्ही. थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना ग्वाही दिली. ही अधिसूचना मंगळवारी, ६ ऑगस्टलाच जारी केली गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि याच अधिसूचनेत एनएसईएलला तिच्या बाजारमंचावर ‘ई-सीरिज’सह सर्व प्रकारचे सौदे घेण्यापासून परावृत्त करणारा आदेशही दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
एनएसईएल या बाजारमंचावरील प्रथम ३१ ऑगस्टला सर्व एक दिवसाच्या वायद्यावर होणारे सौदे स्थगित करण्यात आले, तर कालपर्यंत या बाजारमंचावर सुरू असलेल्या सोने-चांदी व अन्य धातूंचे ‘ई-सीरिज’ सौद्यांनाही आटोपते घेऊन ही संपूर्ण बाजारपेठच मंगळवारपासून ठप्प पडली आहे; परंतु सरकारकडून तसा आदेश मिळण्याआधीच, एनएसईएलने आपणहून मंगळवारपासून ‘ई-सीरिज’ सौदे आटोपते घेतले असल्याचे प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे. ‘फायनान्शियल टेक्नॉलॉजिज इंडिया लि.’ या जिग्नेश शाह प्रवर्तित या बाजारमंचाकडून येत्या १४ ऑगस्टपर्यंत सरकारला थकलेल्या सौद्यांच्या पूर्ततेविषयक आराखडा सादर केला जाणे अपेक्षित आहे. तो आराखडा आणि या भानगडीच्या बारकाव्यांचा तपास करणाऱ्या ‘एफएमसी’कडून सादर होणारा अहवाल या आधारे गुंतवणूकदारांना पैशांच्या परतफेडीला सरकारचे प्राधान्य राहील, असेही थॉमस यांनी स्पष्ट केले.
सरकारी तिजोरीला बरकत; प्रत्यक्ष कर संकलनात वाढ
नवी दिल्ली : देशातील थेट करसंकलनात चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत १३.२७ टक्क्यांची भर पडली आहे. यानुसार एप्रिल ते जुलैदरम्यान १.५७ लाख कोटींचे ढोबळ प्रत्यक्ष करसंकलन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १.३८ लाख कोटी रुपये होते. ढोबळ करसंकलनात समाविष्ट असलेल्या कंपनी करामध्ये (कॉर्पोरेट टॅक्स) यंदा ९.७५ टक्के वाढ झाली असून ते रु. ९२,११५ कोटींवर गेले आहे. तर वैयक्तिक प्राप्तिकर संकलनही १९.३२ टक्क्यांनी उंचावले आहे. एप्रिल-जुलैदरम्यान रु. ६३,५८३ कोटींचा प्राप्तिकर गोळा झाला. रोखे उलाढाल कर (एसटीटी) वधारून रु. १,२६७ कोटी झाला आहे, तर संपत्ती करातील वाढ ३८.६२ टक्के आहे. निव्वळ एकूण प्रत्यक्ष कर १०.३७ टक्क्यांनी वाढला आहे. एकूण आर्थिक वर्षांसाठी प्रत्यक्ष करसंकलनाचे सरकारचे उद्दिष्ट ६.६८ लाख कोटी रुपयांचे आहे.