मुंबई : गेल्या सहामाहीच्या वरच्या टप्प्यावर असलेला अन्नधान्याच्या महागाईचा दर येत्या कालावधीत आणखी वाढण्याची भीती इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केली आहे. करोना-टाळेबंदीमुळे वस्तूंच्या पुरवठय़ावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात दुहेरी अंकाला पोहोचलेला घाऊक महागाई दर मेमध्ये १३ टक्क्यांपर्यंत झेपावण्याची शक्यता नमूद करत नायर यांनी, पुढील तीन महिने तो दुहेरी अंकातच, १०.५ टक्क्यांपर्यंत राहू शकतो, असेही म्हटले आहे. महागाईची चढती कमान कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाढती महागाई पाहता रिझव्‍‌र्ह बँक नजीकच्या कालावधीत व्याजदर कपात करण्याची चिन्हे नाहीत, असेही नायर म्हणाल्या.

इंडिया रेटिंग्जचे प्रधान अर्थतज्ज्ञ सुनिल कुमार सिन्हा यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात प्राथमिक वस्तू, इंधन तसेच ऊर्जा व निर्मित गटातील वस्तूंच्या किमती वाढल्याचे स्पष्ट होते. हे प्रमाण अनुक्रमे १०.२, २०.९ व ९ टक्के राहिल्याचे ते म्हणाले. मसाल्याचे पदार्थ वगळता डाळी, फळे, अंडी, मटण, चहा आदी अन्नधान्यांतील वाढीमुळे यंदा प्रामुख्याने एकूण घाऊक महागाई दर दुहेरी अंकात पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. फळे व भाज्यांच्या किमतीत काहीसा दिलासा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.