अरामको कंपनीच्या सौदीतील दोन प्रकल्पांवर शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कमी इंधनपुरवठा व महागाईत भर पडण्याची चिंता भांडवली बाजारातही सप्ताहारंभी उमटली. पंधरवाडय़ातील सुमार सत्रआपटी नोंदविणाऱ्या सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांवर तेल व विमान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीचाही दबाव राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई निर्देशांक सोमवारी २६१.६८ अंश घसरणीसह ३७,१२३.३१ वर तर ७२.४० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,००३.५० पर्यंत येऊन ठेपला. जवळपास पाऊण टक्के  निर्देशांक घसरणीने प्रमुख निर्देशांक त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून आणखी दुरावले. मुंबई निर्देशांकातील तर केवळ सहा समभागच तेजीच्या यादीत राहू शकले.

सौदी अरेबियातील कंपनीच्या दोन तेल उत्पादन प्रकल्पांवर शनिवारी ड्रोन हल्ला झाल्यानंतर त्याचे सावट जगभरात उमटले. सोमवारी भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया येथेही नोंदली गेली. प्रमुख तेल उत्पादक देशातून येत्या कालावधीत इंधननिर्मिती कमी होऊन परिणामी इंधनाचे दर वाढण्याची भीती बाजारात व्यक्त करताना गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला.

मुंबई निर्देशांकातील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, स्टेट बँक, येस बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी लिमिटेड, टाटा स्टील, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आदी २.५५ टक्क्यांपर्यंत आपटले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अर्थातच तेल व वायू, ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक घसरण फटका बसला. त्याचबरोबर बँक, वित्त, स्थावर मालमत्ता, वाहन, भांडवली वस्तू निर्देशांकही घसरले. तर मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक संमिश्र राहिले. मिड कॅप ०.२७ टक्क्याने घसरला तर स्मॉल कॅप निर्देशांक ०.६४ टक्क्यापर्यंत वाढला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel capital markets sensex nifty index fall abn
First published on: 17-09-2019 at 01:25 IST