नवी दिल्ली ; कर्जबाजारी फ्युचर समूह रिलायन्स रिटेलसोबतचा २४,७१३ कोटी रुपयांचा करार सुरक्षित वित्तपुरवठादारांकडून नाकारल्याने गुंडाळला गेल्यानंतर, आता समूहातील प्रमुख कंपन्या फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स, फ्युचर सप्लाय चेन सोल्यूशन्स, फ्युचर कंझ्युमर आणि फ्युचर एंटरप्रायझेस यांच्या घडण आणि पुनर्बाधणीवर लक्ष केंद्रित करणार  आहे. मात्र सुमारे १८,००० कोटी रुपयांचे कर्जभार असलेली फ्युचर रिटेल लिमिटेड या समूहातील आघाडीच्या कंपनीवरील राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटीपुढे दिवाळखोरीच्या कार्यवाहीला समूह सामोरा जाणार आहे.

फ्युचर एंटरप्रायझेस लिमिटेड, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड, फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड, फ्युचर कंझ्युमर लिमिटेड यासारख्या समूहातील इतर कंपन्या टिकाव धरू शकतात. त्यांच्यावरील कर्ज दायित्वांची पुनर्रचना करून त्यांची वर्तमान कर्जदाते आणि गुंतवणूकदार यांच्या मदतीने पुनर्बाधणी केली जाऊ शकते, अशी किशोर बियाणी प्रवर्तित फ्युचर समूहामध्ये विचारप्रक्रिया सुरू असल्याचे या घडामोडींशी संलग्न सूत्रांनी स्पष्ट केले.

पुनर्बाधणीसाठी लक्ष्य करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये फ्युचर एंटरप्रायझेसवर ५,००० कोटींहून अधिक कर्जदायित्व आहे. ही कंपनी फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स व्यवसायातील आपला हिस्सा विकत आहे. या हिस्सा विक्रीतून तिला सुमारे ३,००० कोटी रुपये मिळू शकतील. हा विक्री करार जवळजवळ पूर्णत्वाला आला आहे. त्यामुळे कंपनीवर बहुतांश कर्ज फेडले जाईल आणि शिल्लक कर्ज कंपनीद्वारे व्यवस्थापित केले जाऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले. ग्राहकोपयोगी उत्पादन निर्मितीतील फ्युचर कंझ्युमर लिमिटेडकडे तुमकूर, कर्नाटक येथे ११० एकर क्षेत्रफळावरील खाद्य उद्यानासारखी मालमत्ता आहे, ज्याचा कंपनीच्या पुनर्बाधणीसाठी उपयोग केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले. फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्सची देशभरात गोदामे विस्तारली आहेत.

समभागांची घसरण

फ्युचर रिटेल लिमिटेडचा किराणा व्यवसाय आणि अन्य मालमत्ता विकत घेण्यासाठी प्रस्तावित २४,७१३ कोटींचा करार शनिवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने रद्द केल्याचा नकारात्मक परिणाम दोन्ही कंपन्यांच्या समभागावर दिसून आला. रिलायन्सचा समभाग २.३१ टक्क्यांनी घसरला. तर मुंबई शेअर बाजारात फ्यूचर समूहातील कंपन्या – फ्यूचर कंझ्युमरचा समभाग १९.९२ टक्क्यांनी, फ्यूचर सप्लाय चेन सोल्युशन्स १९.८५ टक्क्यांनी, फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन्स १९.८९ टक्क्यांनी, फ्यूचर एंटरप्रायझेस ९.८७ टक्के आणि फ्यूचर रिटेलचा समभाग ४.९६ टक्क्यांनी गडगडला.