मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील अग्रणी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’च्या अध्यक्षपदी आकाश अंबानी यांच्या नियुक्तीची मंगळवारी घोषणा करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाने अध्यक्षपदी आकाश अंबानी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सोमवारीच कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. बाजार विश्लेषकांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीजचे आर्थिक कामगिरीचे निकाल लवकरच जाहीर होणार असून, दूरसंचार व्यवसाय वेगळा करून तो ‘जिओ’अंतर्गत सामावला जाण्याच्या शक्यतेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात लवकरच ५ जी सेवेला सुरुवात होणार असून अशा वेळी नव्या पिढीचे प्रतिनिधी आकाश अंबानी यांच्याकडे अग्रणी दूरसंचार कंपनीची सूत्रे आली आहेत.  

‘जिओ इन्फोकॉम’ने पंकज मोहन पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर रिमदर सिंग गुजराल, के. व्ही. चौधरी यांची पाच वर्षांसाठी संचालक म्हणून नियुक्तीची घोषणाही मंगळवारी केली.