हिऱ्यांच्या दागिन्यांच्या जागतिक पातळीवरील मागणीने २०१३ मध्ये ७९ अब्ज डॉलरची विक्रमी पातळी गाठली आहे. पैलू पाडलेल्या हिऱ्यांची अमेरिकेतील मागणी गेल्या वर्षांत ७ टक्क्यांनी वाढली. तर भारत व चीनमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेत २००८ ते २०१३ या कालावधीत स्थानिक चलनानुसार वार्षकि १२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
हिऱ्यांच्या दागिन्यांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेत पुन्हा येत असलेला जोम व चीन, भारतासारख्या विकसनशील देशांमधील मध्यम वर्गात होत असलेली वाढ यामुळे भविष्यात दीर्घकाळपर्यंत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मागणीत अशीच वाढ होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जगभरातील ग्राहकांना हिऱ्यांचे विशेष आकर्षण वाटत असले तरी भविष्यातील मागणीचा स्तर गृहीत धरता येणार नाही, असा इशारा याबाबतच्या ‘द डे बीअर्स ग्रुप ऑफ कंपनी’ने प्रकाशित केलेल्या ‘डायमन्ड इनसाइट’ सर्वेक्षणात देण्यात आला आहे. या संपूर्ण उत्पादन विभागाला इतर उंची उत्पादनांकडून कडव्या, तीव्र स्पध्रेचा सामना करावा लागत असून अमेरिकी बाजारपेठेत जाहिरातींमधील हिऱ्यांचा हिस्सादेखील कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
२०१३ मध्ये जागतिक पातळीवरील हिऱ्यांच्या उत्पादनात आधीच्या वर्षांच्या तुलनेत कॅरटनुसार ७ टक्क्यांची वाढ झाली. एकूण उत्पादन १४.५ कोटी कॅरटस् नोंदवले गेले. परंतु तरीही २००५च्या सर्वात जास्त जवळपास १७.५ कोटी कॅरटस्पेक्षा हे उत्पादन खूपच कमी होते. सध्याच्या स्रोतांकडून पुरवठय़ातील संभाव्य घट येत्या वर्षांतील नवीन उत्पादनाइतकी असणार नाही व २०२० नंतर पुरवठय़ांमध्ये घट होण्यास सुरुवात होण्याच्या आधी दशकाच्या दुसऱ्या अध्र्या भागात त्याची पातळी समसमान राहील, असेही या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांची मागणी हा हिरे उद्योगातील महत्त्वाच्या काही मूल्य स्रोतांपकी एक आहे. २०१३ मधील विक्रमी वाढीनंतर हिऱ्यांची मागणी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. परंतु केवळ एवढय़ावरच समाधान उपयोगाचे नाही. उत्पादन, विपणन व तंत्रज्ञानात गुंतवणूक केली न गेल्यास इतर उत्पादनांकडून असलेल्या या स्पध्रेत या उद्योगाची स्पर्धात्मकता टिकून राहणे कठीण होईल.  
– फिलिप मेलीयर, मुख्यार्धिकारी, ‘डी बीअर्स ग्रुप’.