चलन व्यवहारात रुपया आणि भांडवली बाजारात सेन्सेक्ससह निफ्टी शुक्रवारी सावरले असले तरी सराफा दरातील घसरण कायम राहिली. स्टॅन्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमचा भाव आज २६५ रुपयांनी घरंगळत २७ हजाराखाली म्हणजे २६,८९५ रुपयांवर उतरला. तर शुद्ध सोन्याचा भाव तोळ्यासाठी २७ हजाराच्या काठावर राहिला. चांदीच्या दरांमध्येही शुक्रवारी मोठी घट पहायला मिळाली. चांदीचा प्रति किलो भाव ७६५ रुपयांनी कमी होत ४२ हजार ३५० रुपयांवर आला आहे.
सराफ बाजारातील नरमाई गेल्या काही सत्रांपासून कायम आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या धोरणाने जागतिक स्तरावर गुरुवारी मौल्यवान धातूंच्या किंमती लक्षणीय रोडावल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर सोन्याच्या किमती दोन वर्षांच्या नीचांकस्तरावर रोडावल्या. मुंबई सराफ बाजारातही सोने तोळ्यामागे एकाच दिवसात तब्बल ७६५ रुपयांनी कमी होऊन ते थेट २७ हजार रुपयांवर आले होते. तर चांदीच्या किलोसाठीच्या दरातही काल जवळपास दोन हजार रुपयांची घट झाल्याने चांदीचा भाव ४३ हजार रुपयांवर ठेपला होता.