वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षांत १७,९९३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील एकूण २८ बँकांपैकी १४ बँकांना तोटा झाला आहे. तर उर्वरित अध्र्या बँकांना २०१५-१६ मध्ये नफा झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी शुक्रवारी संसदेत दिली. एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, १४ बँकांनी २०१५-१६ मध्ये एकूण १७,९९३ कोटी रुपये तोटा जाहीर केला आहे.
तोटा नोंदविणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक ६,०८९ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. तर बँक ऑफ बडोदाची तोटा रक्कम ५,३९६ कोटी रुपये आहे. तोटा नोंदविणाऱ्या अन्य बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, सिंडिकेट बँक आदींचा समावेश आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत नफ्याचा ताळेबंद सादर करणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक, तिच्या काही सहयोगी बँका, आंध्रा बँका यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पाव्यतिरिक्त बँकांना चार वर्षांसाठी ७०,००० कोटी रुपये देण्याचे सरकारने प्रस्तावित केल्याचे गंगवार म्हणाले. पैकी गेल्या आर्थिक वर्षांत १९ बँकांना २५,००० कोटी रुपये दिले गेले आहेत. तर चालू आर्थिक वर्षांत आणखी २५,००० कोटी रुपये दिले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
वाढती अनुत्पादित मालमत्ता व अतिरिक्त निधी तरतूद करण्याच्या रिझव्र्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे बँकांच्या तोटय़ाचा आकडा वाढल्याचेही अर्थ राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कर्ज वसुलीकरिता बँकांच्या उपाययोजना आता प्रत्यक्षात येत असून त्याचे परिणाम बँकांच्या येणाऱ्या काही तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांद्वारे दिसतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
- सार्वजनिक क्षेत्रातील २८ बँकांपैकी १४ बँकांना तोटा
- बँक ऑफ इंडियाला ६,०८९ कोटींचे नुकसान
- बँक ऑफ बडोदाचा तोटा ५,३९६ कोटींचा