नवी दिल्ली : देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाने सरलेल्या जुलै महिन्यात १.४९ लाख कोटींचा टप्पा गाठल्याचे अर्थमंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. मार्च महिन्यापासून सलग पाचव्या महिन्यात करसंकलनाने १.४० लाख कोटींपुढील मजल कायम राखली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थचक्र गतिमान होत असून ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे संकलन वाढते राहिले आहे. याचबरोबर केंद्र सरकारने करचोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे संकलनात वाढ होत असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षांतील जुलै महिन्याच्या तुलनेत कर संकलन यंदा २८ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १.१६ लाख कोटींचे संकलन नोंदवले गेले होते. तर त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच जुलै २०२० मध्ये कर संकलन अवघे  ८७,४२२ कोटी रुपये होते.

सरलेल्या जुलै २०२२ मधील एकत्रित जीएसटी महसूल १,४८,९९५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम २५,७५१ कोटी, राज्य जीएसटीची रक्कम ३२,८०७ कोटी आणि एकात्मिक जीएसटीची रक्कम ७९,५१८ कोटी रुपये (आयात वस्तूंवर मिळालेल्या ४१,४२० कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम १०,९२० कोटी (आयातीवर मिळालेल्या ९९५ कोटी रुपयांसह) इतकी होती, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने नवा विक्रम करत प्रथमच दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. देशात २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर जुलै २०२२ मधील संकलन हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन आहे. जुलैमध्ये, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ४८ टक्क्यांनी वधारला आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा २२ टक्क्यांनी जास्त नोंदवला गेला आहे.

जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे कायम असून त्यात निरंतर वाढ होत आहे. जीएसटी संकलनासाठी १.४० लाख कोटी हा आता तळ निश्चित झाला असून यापुढे ते कायमच वाढते राहणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.

More Stories onजीएसटीGST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collections rises 28 percent to rs 1 49 lakh crore in july zws
First published on: 02-08-2022 at 04:00 IST