मुंबई : सणासुदीत अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या मागणीचा सुपरिणाम म्हणून नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन १.३१ लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. हे आजवरचे दुसरे सर्वोच्च मासिक कर संकलन आहेच, पण सलग दुसऱ्या महिन्यांत ते १.३० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदविले गेले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने नोव्हेंबर २०२१ ची जीएसटी संकलनाची आकडेवारी बुधवारी जाहीर केली. चालू वर्षांत एप्रिलमध्ये अप्रत्यक्ष करापोटी सर्वाधिक १.४१ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्यानंतरचे यंदाच्या नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च दुसरे असे १,३१,५२६ कोटी रुपये या करापोटी गोळा झाले आहेत. सणोत्सवाच्या काळात देशभरात वस्तू आणि सेवांची मागणी वाढलेल्या या महिन्यांतील कर संकलन हे मागील वर्षांतील नोव्हेंबरच्या तुलनेत २५ टक्के अधिक, तर २०१९-२० मधील नोव्हेंबरच्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे.

सरकारचे महसुली उत्पन्न प्रत्येक महिन्याला वाढत असून, मागील सलग पाच महिन्यांत जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा अधिक, तर ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही ते १.३० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबरमधील महसुलात केंद्रीय जीएसटीचा वाटा २३,९७८ कोटी रुपये, तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा ३१,१२७ कोटी रुपये आहे. तर वसूल केलेल्या एकात्मिक जीएसटीपोटी ६६,८१५ कोटी रुपये मिळाले आहेत. आयात केलेल्या वस्तूंवर आकारण्यात आलेल्या ३२,१६५ कोटी रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे. तर ९,६०६ कोटी रुपयांच्या उपकराची वसुली झाली आहे. यात आयात वस्तूंवर आकारण्यात आलेल्या ६५३ कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे.