यंदा सरासरीइतकापाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत पाहता, खरिपाच्या उत्पादनांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि देशाची अन्नधान्य आयातीवरील मदार कमी व्हावी, या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने २०१३-१४ च्या खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांसाठी किमान हमीभावाची घोषणा गुरुवारी सायंकाळी केली. यातून मुख्यत: सर्वाधिक आयात होत असलेल्या तेलबिया आणि डाळींच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे.
खरिपाचे महत्त्वाचे पीक असलेल्या भातपिकाच्या पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण गेल्या वर्षी हमीभावात १५.७ टक्के वाढ मिळविणाऱ्या भातपिकाच्या वाटय़ाला यंदा केवळ ४.८ टक्क्यांची वाढ आली आहे. कापसाच्या वाटय़ालाही गेल्या वर्षांच्या २८.५ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत यंदा केवळ २.७ टक्के वाढ आली आहे. तेलबिया, सोयाबीन यांच्या हमीभावात गेल्या वर्षांच्या तुलनेत १३ टक्क्यांहून अधिक वाढ पाहता, या पिकांमधून आजवर चांगला लाभ मिळविलेल्या शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामात त्यांच्या लागवड क्षेत्रात वाढ केली जाणे अपेक्षित आहे.

खरिपातील एकूण उत्पादन हे पावसाच्या प्रगतीवर निश्चितच अवलंबून असेल. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे एकूण उत्पादन घटून पुरवठय़ावर विपरीत परिणाम दिसून आला होता. पण यंदा वेळेआधीच दाखल झालेला पाऊस, वेळेवर झालेल्या पेरण्या पाहता खरिपातील पिकांचा पुरवठाही वेळेत उपलब्ध होऊ शकेल. हमीभावात उमदी वाढ मिळालेल्या तेलबिया, तूरडाळ, सोयाबीन या पिकांचे लागवड क्षेत्र विस्तारेल, तर कापसाचे लागवड क्षेत्र आक्रसण्याची भीती मात्र आहे.
वेदिका नार्वेकर, एंजल कमॉडिटीज् ब्रोकिंग