scorecardresearch

महाविलीनीकरण ; एचडीएफसी बँकेत पालक कंपनी एचडीएफसीच्या विलयाची घोषणा ;‘समसमान असणाऱ्यांचे एकत्रीकरण’

या प्रस्तावित व्यवहारातून एचडीएफसी बँकेला गृहकर्ज क्षेत्रातील व्यवसाय विस्तारता येऊन, ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ साधता येईल.

मुंबई: देशाच्या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात मोठय़ा विलीनीकरणाची घोषणा सोमवारी देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने केली. उभयतांच्या या महाविलीनीकरणातून जागतिक आघाडीच्या अव्वल १०० कंपन्यांच्या पंक्तीत, महाकाय भारतीय वित्तीय संस्थेला जागा मिळविता येणार आहे.

या विलीनीकरणापश्चात एचडीएफसी बँक ही १०० टक्के सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी कंपनी बनेल, तर एचडीएफसी लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांची एकत्रित एचडीएफसी बँकेत ४१ टक्के मालकी राहील, असे स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील २५ समभागांमागे, एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग (१ : १.६८ या प्रमाणात) मिळविता येतील.

एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांचे हे विलीनीकरण रिझव्‍‌र्ह बँक आणि अन्य नियामकांच्या सर्व मंजुऱ्या व परवान्यांचे सोपस्कार पूर्ण करून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत मार्गी लागणे अपेक्षित आहे. या प्रस्तावित व्यवहारातून एचडीएफसी बँकेला गृहकर्ज क्षेत्रातील व्यवसाय विस्तारता येऊन, ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ साधता येईल.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे प्रस्तावित एकत्रीकरण हे संपूर्णपणे परस्परांसाठी पूरक आहे आणि एचडीएफसी बँकेच्या मूल्यवर्धनाला ते उपकारक ठरेल. एचडीएफसी बँकेला उभयतांच्या एकत्रित मोठय़ा ताळेबंदाचा आणि नक्त मत्तेचा फायदा होईल, ज्यामुळे मोठय़ा रकमेचे कर्जाचे व्यवहार शक्य होऊ शकतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेत कर्जाचा प्रवाह सक्षम होण्यासह, पतवाढीचा वेगही सुधारेल, असा विश्वास एचडीएफसीने यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विश्वास व्यक्त केला आहे.

एकत्रीकरणातून काय साधले जाईल?

* सध्या एचडीएफसी बँकेच्या ६ कोटी ८० लाख ग्राहकांपैकी, ३० टक्के ग्राहकच केवळ एचडीएफसीचे प्रत्यक्ष कर्जधारक असल्याचे चित्र पाहता, गृह कर्ज क्षेत्रातील बँकेच्या क्षमता विलिनीकरणानंतर लक्षणीय विस्तारतील.

* ‘एस अँड पी’च्या मते, विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेचा कर्ज व्यवसाय ४२ टक्क्यांनी वाढवून १८ लाख कोटी रुपयांवर जाईल आणि बँकेचा बाजार हिस्सा सध्याच्या ११ टक्क्यांवरून सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढेल. सरकारी मालकीच्या स्टेट बँकेपाठोपाठ देशातील ती दुसरी सर्वात मोठी बँक असेल. तर देशातील तिसरी मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तुलनेत तिचे दुप्पट आकारमान असेल.

* यातून एचडीएफसी बँकेत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना प्रवेशास अधिक वाव निर्माण होईल, जे सध्या ७४ टक्के या अत्युच्च स्वीकार्य मर्यादेच्या पातळीवर आहे.

* विलीनीकरणाने सत्तरीच्या घरात पोहोचलेले एचडीएफसी लिमिटेडमधील वरिष्ठ व्यवस्थापनाचे – दीपक पारेख, केकी मिस्त्री, रेणू सूद कर्नाड यांचे उत्तराधिकारी शोधण्याच्या समस्येचे आपोआपच निवारण केले जाईल, असे ‘मॅक्वायरी रिसर्च’ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

रेरासारख्या नियामकाची स्थापना, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, सर्वासाठी घरे आणि परवडणारी घरे यासारख्या सरकारी योजनांची अंमलबजावणी यामुळे येत्या काळात गृह वित्त व्यवसाय झपाटय़ाने वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. हे समसमानांचे विलीनीकरण या काळाची गरज म्हणूनच पडलेले पाऊल आहे, अशी एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी यानिमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त केली. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांच्या मते, या विलीनीकरणातून एचडीएफसी बँक ही जागतिक मानकांनुसारही एक मोठी बँक बनू शकेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hdfc limited and hdfc bank announce merger zws

ताज्या बातम्या