नवी दिल्ली : देशातील आघाडीची दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पवर प्राप्तिकर विभागाने २३ मार्च ते २६ मार्चदरम्यान विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून कंपनीने करचोरी केल्याचा उलगडा केला आहे. सूत्रांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने एक हजार कोटींहून अधिक बनावट खर्च दाखवून कर वाचविला आणि दिल्लीतील छत्तरपूर येथील फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याचे पुढे आले आहे.
हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष व मुख्याधिकारी पवन मुंजाल यांच्यासह, प्रवर्तकांच्या कार्यालयावर व घरावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ मार्चला छापे टाकत काही आर्थिक दस्त आणि कागदपत्रे ताब्यात घेतली होती. कंपनीने करचुकवेगिरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने अध्यक्षांसह इतर प्रवर्तकांच्या दिल्ली एनसीआरसह ४० ठिकाणांची प्राप्तिकर विभागाकडून झडती घेण्यात आली होती.
कंपनीच्या दिल्ली, गुडगांव येथील कार्यालयांत प्राप्तिकर विभागाचे तपास पथक गेल्या बुधवारी सकाळी दाखल झाले होते. त्या समयी आर्थिक व्यवहारांची तपासणी, दस्तऐवजांची छाननी व डिजिटल माहितीच्या रूपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. कंपनीने करपात्र उत्पन्नात कपात करण्यासाठी, १,००० कोटींहून अधिक रुपयांचे बनावट खर्च दाखवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. याचबरोबर दिल्लीजवळील भागात एका फार्म हाऊसच्या खरेदीमध्ये १०० कोटींहून अधिक मूल्याचा व्यवहार रोख स्वरूपात केल्याचा पुरावाही प्राप्तिकर विभागाला मिळाला आहे.