होंडा कार्स इंडिया लि.ने आपल्या सर्वाधिक खपाच्या अमेझ या सेदान प्रकारातील कारचे तर ब्रियो या हॅचबॅक वाहनाच्या विकल्या गेलेल्या ३१,२२६ गाडय़ा परत मागविल्या आहेत. ब्रेक प्रणाली सदोष असण्याचा संभव लक्षात घेऊन, आवश्यक चाचण्या व तपासणीसाठी या गाडय़ा मागविण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
२८ फेब्रुवारी २०१३ आणि १६ जानेवारी २०१४ या तारखेला तयार करण्यात आलेल्या १५,६२३ ब्रियो आणि १५,६०३ पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या अमेझ कार आवश्यक तपासणीसाठी मागविण्यात आल्याचे कंपनीने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार स्पष्ट होते. तपासणीनंतर ब्रेक प्रणाली नव्या बदलणे आवश्यक ठरल्यास ही संपूर्ण प्रक्रिया विनाखर्च होंडाच्या देशभरातील अधिकृत विक्रेत्यांकडून पार पाडली जाईल आणि त्या संबंधीच्या सूचना कंपनीकडून या कारच्या खरेदीदारांना व्यक्तिगतरीत्या दिल्या जाणार आहेत. तथापि ग्राहकांनी त्यांचे १७ आकडी ‘व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबर’ (व्हीआयएन) कंपनीच्या वेबस्थळावरील विशिष्ट दालनांत अंकित करून, माघारी बोलाविण्यात आलेल्या कारमध्ये त्यांनी विकत घेतलेली कार आहे की नाही याची खातरजमा करून घेता येईल.

माघारीची वारंवारिता!
अलीकडच्या काळात कार माघारी बोलाविण्याची देशाच्या वाहन बाजारपेठेतील पाचवी घटना आहे. गेल्या महिन्यातलीच देशातील सर्वात मोठी कार माघारीची घटना म्हणजे सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी इंडियाला तब्बल १ लाखांहून अधिक विकल्या गेलेल्या अर्टिगा, स्विफ्ट आणि डिझायर मॉडेलच्या कार माघारी बोलाविण्याचा प्रसंग ओढवला होता. त्या आधी टोयोटा किलरेस्कर मोटरने आपल्या बहुपयोगी वाहन- इनोव्हाच्या ४४,९८९ गाडय़ा ग्राहकांकडून मागवून घेतल्या. गेल्या वर्षी जनरल मोटर्स इंडियाला आपल्या शेव्हरोले तव्हेरा या मॉडेलच्या १.१४ लाख मोटारी ग्राहकांकडून मागवून घ्याव्या लागल्या होत्या.