केंद्रात अवतरलेल्या नव्या व स्थिर सरकारमुळे देशातील गृहनिर्माण व्यवसायात उत्साह संचारला असून या क्षेत्राच्या विकासाला पूरक बाबींचे दर्शनही यंदाच्या मध्यान्ही अर्थसंकल्पात दिसल्याचा दावा करतानाच चालू वर्षांच्या उर्वरित कालावधीत घरांची विक्री वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या ‘नाइट फ्रॅन्क’ने याबाबतचा अहवाल मंगळवारी सादर केला. या वेळी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिरीष बैजल हे उपस्थित होते. ते म्हणाले की चालू वर्षांच्या सहा महिन्यांमध्ये घरांची विक्री २६ टक्क्यांनी वाढेल.
कंपनीने देशातील प्रमुख शहरांचा या दृष्टीने अभ्यास केला असून यानुसार महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह निवडक सहा शहरांमधील घरविक्री १,५२,७६४ होईल, असे म्हटले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेली नव्या घरांची निर्मितीही ५ टक्क्यांनी उंचावून १,६९,६०२ होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
यंदाही घरखरेदीदारांसाठी संथ अर्थव्यवस्था, वाढते व्याजदर, वाढती महागाई तसेच कमकुवत रुपया या बाबी निर्णयासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत, असेही बैजल म्हणाले. तुलनेत नव्या सरकारने गुंतवणूकदारांमध्ये या क्षेत्राबाबत अधिक आशावाद निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.