जागतिक सुवर्ण परिषदेच्या धर्तीवर मौल्यवान शुभ्र धातू चांदीच्या जागतिक व्यापाराचाही ठाव घेणाऱ्या पहिल्या ‘वर्ल्ड सिल्व्हर कौन्सिल’ची पायाभरणी सर्वाधिक चांदी आयातदार असलेल्या भारतातून ‘इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असेसिएशन (आयबीजेए)’च्या पुढाकारातून झाली आहे. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारंभात, आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी चांदी उद्योगाला विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी आणि नवतरुणांच्या नावीन्यपूर्ण उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याची घोषणा केली.
‘वर्ल्ड सिल्व्हर कौन्सिल’च्या या उपक्रमासाठी चांदी-खाण क्षेत्रातील उद्योग, व्यापारी, शुद्धीकरण प्रकल्पांचे चालक, प्रक्रियादार आणि सराफ उद्योगातून पाठबळ व सहभाग मिळविणार असल्याचे कम्बोज यांनी स्पष्ट केले. भारतात दरसाल सरासरी ७,००० टन चांदी आयात केली जाते. दागिन्यांप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विविध औद्योगिक प्रक्रियांसाठी चांदी मोठय़ा प्रमाणात वापरात येते. तथापि चांदीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणारी, शुद्धतेचे मानदंड स्थापणाऱ्या यंत्रणेची असलेली उणीव ‘वर्ल्ड सिल्व्हर कौन्सिल’मधून भरून निघेल, असा विश्वास रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सोने, चांदी आभूषण कारागिरीच्या कौशल्याच्या विकासासाठी व चालना देण्यासाठी आयबीजेएच्या पुढाकाराने कौशल्य विकास परिषद आणि फर्स्ट स्टेप फाऊंडेशनची स्थापनाही करण्यात आली.