एसबीआय म्युच्युअल फंड या भारतातील सर्वात जुन्या आणि मोठय़ा म्युच्युअल फंडाने सोमवारी एक आगळा विक्रम करताना, एकाच वेळी २३ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ५१ नवीन शाखा सुरू केल्या.
नवीन शाखांद्वारे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एकूण शाखांची संख्या १६१ वर गेली असून त्या २७ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशात विस्तारल्या आहेत. म्युच्युअल फंडांचा फैलाव असलेल्या अव्वल १५ महानगरांपलीकडच्या (टी-१५) अन्य १५ शहरांमध्ये (बी-१५) या शाखा उघडण्यात आल्या आहेत.
‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य,  एसबीआय म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश खारा आणि एसबीआय समूहातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ५१ शाखांच्या अनावरणाची घोषणा केली.
महानगरांखेरीज इतर शहरांमधील तसेच छोटय़ा केंद्रांमधील गुंतवणूकयोग्य अतिरिक्त रक्कम योग्य पद्धतीने गुंतवली जाईल; या शहरांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंडाच्या शाखांच्या अस्तित्वामुळे गुंतवणूकदारांना आपली रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता येईल. असा उपक्रम या ठिकाणच्या गुंतवणूकदारांमध्ये वित्तीय साक्षरतेसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास अरुंधती भट्टाचार्य यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या नवीन ५१ शाखांचे अनावरण झाल्यामुळे आता हा फंड बी १५ ठिकाणांमध्ये शाखांच्या संख्येत (१३९) पहिल्या क्रमांकावर आला आहे.