नवी दिल्ली : इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती नरमल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराने सप्टेंबरमध्ये १०.७ टक्के म्हणजे १८ महिन्यांपूर्वीच्या तळाशी विसावण्याचा दिलासादायी फेर धरला आहे. दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सप्टेंबर महिन्याच्या किरकोळ महागाई दराने ७.४१ टक्क्यांचा दाखविलेला चढ पाहता, घाऊक महागाईचा हा दर मोठी उसंतच म्हणता येईल.

सलग चौथ्या महिन्यात या दराने दाखविलेली ही घसरण असून, गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये हा दर १२.४१ टक्के पातळीवर होता, तर वर्षभरापूर्वी म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये तो ११.८० टक्के पातळीवर होता. महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांच्या होरपळीचा प्रत्यय मे महिन्यातील घाऊक महागाई दराने विक्रमी पातळी गाठून दिला होता. मे महिन्यात घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांवर पोहोचला होता. २०१२ नंतरची त्याची ही उच्चांकी पातळी होती. पुढे जूनपासून मात्र घाऊक महागाई दरात घसरण कायम आहे. सरलेल्या या काही महिन्यात महागाई दराने किंचित दिलासा दिला असला तरी तो सलग १८ व्या महिन्यात दोन अंकी स्तरावर कायम आहे.

सरलेल्या सप्टेंबर महिन्यात मुख्यत्वे खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, मूलभूत धातू, वीज, कापड इत्यादींच्या किमतीत मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. निर्देशांकात १४ टक्के वाटा असलेल्या अन्नधान्याच्या किमती या ऑगस्टमधील १२.३७ टक्क्यांच्या तुलनेत ११.०३ टक्के अशा किंचित घसरल्याने एकूण निर्देशांकावर अंकुश ठेवण्यास ही बाब मदतकारक ठरली. मात्र दुसरीकडे भाजीपाल्याच्या किमतीत तर ३९.६६ टक्के वाढ झाली आहे. जी ऑगस्ट महिन्यात २२.२९ टक्के नोंदवली गेली होती. इंधन व वीज वर्गवारीतील उत्पादनांच्या किमतीत आधीच्या महिन्याच्या तुलनेत किंचित घट झाली. त्यातील महागाई दर ३३.६७ टक्क्यांवरून कमी होत सप्टेंबरमध्ये ३२.६१ टक्क्यांवर पोहोचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र उत्पादित वस्तूंचा महागाई दर आणि तेलबियांच्या दरातील वाढ अनुक्रमे ६.३४ टक्के आणि उणे १६.५५ टक्के नोंदवली गेल्याने घाऊक महागाईची मात्रा कमी करण्यास ती उपकारक ठरली.