अर्थव्यवस्थेत मरगळ असली, भविष्यातील अनिश्चिततेने जनमानस घेरलेले असले तरी देशात विरंगुळा, करमणूक व दिवसभरासाठी मनोरंजन करणाऱ्या ठिकाणांकडे लोकांचा ओढा कमी होताना दिसत नसून, निरनिराळ्या ठिकाणी उभी राहत असलेली नवनवीन मनोरंजन उद्याने याची प्रचीती देतात. भारतातील या मनोरंजन उद्याने उद्योगाच्या व्याप्तीचा प्रत्यय देणारे प्रदर्शन ‘इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्‍स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ने गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात आयोजित केले आहे. यंदाचे हे प्रदर्शनाचे १४ वे वर्ष असून, भारतासह विदेशातून १५ देशांचे प्रतिनिधित्व असलेले हे ८० दालनांचे प्रदर्शन शुक्रवार, ७ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत सुरू असेल. अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत खडतर काळ असताना, सरलेल्या २०१३ सालात या उद्योगाने ८ टक्क्य़ांचा माफक का होईना, वृद्धीदर दाखविल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष योगेश डांगे यांनी दिली. ज्या गतीने नवनवीन गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे आणि नवीन ठिकाणे विकसित होत आहेत, ते पाहता २०२० पर्यंत ही बाजारपेठ वार्षिक ४००० कोटींपल्याड जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘मिंटेल’ या जागतिक बाजार सर्वेक्षण संस्थेनुसार, भारतात पर्यटनाच्या वाढीबरोबरीनेच मनोरंजन उद्यानांचा विकास हा २०१७पर्यंत वार्षिक १८.९ टक्के दराने होत राहील आणि या उद्यानांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वार्षिक १३ कोटींच्या घरात जाईल.