भारताने सरलेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत शेजारच्या चीनला मागे टाकणारा अर्थव्यवस्थेत वाढीचा वेग धारण केला आहे. जानेवारी ते मार्च २०१५ या तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास दर केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ७.४ टक्के या पूर्वअंदाजापेक्षा सरस म्हणजे ७.५ टक्क्य़ांवर गेला आहे. विविध तज्ज्ञ गटांकडून हा दर ७.३ टक्के राहण्याची भीती व्यक्त केली गेली होती. तथापि प्रत्यक्षात चीनच्या ७ टक्के विकास दराला या जाहीर झालेल्या आकडेवारीने मागे टाकले आहे.
आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा २०१४-१५ या एकूण आर्थिक वर्षांतील विकास दरही ७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुधारीत मापन पद्धतीनुसार आधीच्या २०१३-१४ मध्ये हा दर ६.९ टक्के होता. तर २०१४-१५ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरचा आर्थिक विकास दर ६.६ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने एकूण २०१४-१५ साठीचा विकास दर अंदाज ७.४ टक्के अपेक्षिला होता. तर मूडीज, क्रेडिट रेटिंग आदी पतमानांकन संस्था तसेच बँका, उद्योग संघटना यांनाही हा प्रवास ७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे अंदाजले होते. प्रत्यक्षात त्यात किरकोळ मात्र वाढच नोंदली गेली आहे.
देशाच्या गेल्या आर्थिक वर्षांतील विकास दराचे चढते आकडे शुक्रवारी उशिरा जाहीर झाल्यानंतर भारताला ८ ते ९ टक्के वेग राखणे शक्य असल्याचो विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. २०१४-१५ मध्ये निर्मिती क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्राने वाढ नोंदविल्याचेही ते म्हणाले.
यंदाची विकास दराची आकडेवारी ही नव्या मापन पद्धतीवर आधारलेली आहे. ही पद्धती कार्यालयानेच विकसित केली आहे. यानुसार गेल्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची ७.१ टक्के, बहुपयोगी सेवा क्षेत्राची ७.९ टक्के, बांधकाम क्षेत्राची ४.८ टक्केतर वित्त-स्थावर मालमत्ता क्षेत्राची ११.५ टक्के दराने वाढ झाली आहे. नकारात्मक प्रवास नोंदविणाऱ्या क्षेत्रात कृषी (०.२%), खनिकर्म (२.४%) यांचा समावेश राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक विकास दरात वाढीबाबत चीनला तर आपण मागे टाकले हे आनंदाचे आहेच, यंदाचा वाढीचा दर हा खरोखरच प्रोत्साहनदायीही आहे. अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे हे द्योतक आहे. प्रामुख्याने तिमाहीच्या कालावधीत निर्मिती आणि सेवा क्षेत्राची वाढ झाल्याचे दिसून येते.
-अरविंद सुब्रमण्यन, मुख्य आर्थिक सल्लागार

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian economy grows at 7 3 per cent in 2014
First published on: 30-05-2015 at 01:03 IST