डॉलरच्या तुलनेत तळापर्यंत फिरणाऱ्या रुपयाला स्थिरता येण्याच्या दृष्टिने रिझव्‍‌र्ह बँकेने काही उपाययोजना अवंलबिल्या. यानुसार बँकांना वायदा पूर्तीसाठी थेट चलन वायदे व्यवहार करण्यास र्निबध घातले. मात्र अत्यावश्यक असेल तेव्हा बँका त्यांच्या ग्राहकांमार्फत चलन वायदे व्यवहार करू शकतील, अशी सूट देण्यात आली आहे. तर तेल कंपन्यांनाही कोणत्याही एकाच राष्ट्रीयकृत बँकेमार्फतच डॉलर खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे. चलनातील अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी तेल आयातदारांना लागणाऱ्या परकी चलनाची गरज आता कंपन्यांनी एकाच बँकेमार्फत पुरवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. चलनाचा दरही मध्यवर्ती बँक नियमित जारी करेल, त्याप्रमाणेच आकारला जावा, असेही सुचित करण्यात आले आहे. अमेरिकन डॉलरची मागणी नोंदविणारे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या सर्वात मोठय़ा खरेदीदार आहेत. त्यांच्यामार्फत महिन्याला ८ ते ८.५ अब्ज डॉलरची मागणी नोंदविले जाते. यासाठी ते विविध बँकांमार्फत ती पुरी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वधारत्या रुपयाने सेन्सेक्सला आवेग!
चलन व्यवहारात रुपया सावरल्याचे पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी निर्धास्त समभागांची खरेदी केली. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स ११४.७१ अंशांनी उंचावत १९,४३९.४८ वर पोहोचला. ५८००च्या पुढे राहत निफ्टी ४७.४५ अंश वाढ नोंदवत ५८५९ वर बंद झाला. रुपयाने कालच्या व्यवहारात ६१पर्यंत विक्रमी अवमूल्यन नोंदविले होते. मात्र त्यानंतर दिवसअखेर व मंगळवारीही सुरुवातीच्या व्यवहारात सावरलेला रुपया पाहून भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली. चलनाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या सकारात्मक उपाययोजनांच्या घोषणेचेही बाजाराने स्वागत केले. जागतिक शेअर बाजारांच्या वधारणेच्या जोडीला येथेही सेन्सेक्सचा प्रवास दिवसभरात १९ हजारांच्या वरच राहिला. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक १.९३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवीत होते. सेन्सेक्समधील २२ समभागही वधारले. एचडीएफसी बँक, सन फार्मा, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, इन्फोसिस, रिलायन्स, बजाज ऑटो असे सारेच तेजीत होते.

रुपयाला हातभार
नियामकांचा प्रत्यक्षातील हस्तक्षेप रुपयाला आज आणखी उंचावण्यास कारणीभूत ठरला. कालच्या व्यवहारात ६१ पर्यंत खाली गेलेला आणि दिवसअखेरही घसरण नोंदविणारा रुपया मंगळवारी डॉलरच्या तुलनेत ४७ पैशांनी उंचावला. ६०.१४ वर रुपया आज स्थिरावला. मध्यंतरात त्याने ६०.४८ असा खालचा प्रवास केला. मात्र दिवसअखेर तो सावरला. व्यवहारात सेबीने तर व्यवहार बंद झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाबाबत उपाय योजले. चलन वायदे व्यवहारावर सेबीने मंगळवारी र्निबध आणले, तर दिवसअखेर रिझव्‍‌र्ह बँकेने देशातील तेल कंपन्यांना कोणत्याही एकाच बँकेमार्फत अमेरिकन चलन खरेदी करण्यास सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian rupee rbi orders oil companies to buy us dollars from one psu bank
First published on: 10-07-2013 at 12:24 IST