सरत्या तिमाहीत भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गेल्या दोन वर्षांतील पहिली आपटी नोंदविली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात विक्रीधोरण अवलंबिणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांमुळे सेन्सेक्स एप्रिल ते जून या तिमाहीत ०.६३, तर निफ्टी याच कालावधीत १.४४ टक्क्य़ांनी घसरला आहे. जुलै ते सप्टेंबर २०१३ तिमाहीनंतरची ही पहिली घसरण आहे.
१ एप्रिल २०१५ रोजी २८,२५० वर असणारा सेन्सेक्स आता, ३० जून रोजी २७,८०० च्याही खाली आला आहे. तर तिमाहीच्या सुरुवातीला ८,५०० पुढे असणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तिमाहीअखेरिस ८,४०० च्या आतच राहिला आहे. जूनमधील दोन्ही निर्देशांकातील घसरण एक टक्क्य़ांपर्यंत नोंदली गेली आहे.
मोठय़ा घसरणीने नव्या सप्ताहाची सुरुवात करणारा भांडवली बाजार मंगळवारी काहीसा सावरला. १३५.६८ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,७८९.८३ वर पोहोचला. तर ५०.१० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३६८.५० पर्यंत गेला.
चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचा मंगळवारचा शेवटचा दिवस होता. या तिमाहीतील सेन्सेक्सचा प्रवास मात्र नुकसानीचा राहिला आहे. गेल्या दोन वर्षांनंतर निर्देशांकांनी प्रथमच तिमाही आपटी नोंदविली आहे.
गेल्या दोन सत्रात मुंबई निर्देशांक २५०.८२ अंशांनी घसरला आहे. चालू सप्ताहाचा प्रारंभ करताना तर त्यावर सत्रातील ६०० अंशांच्या घसरणीचे सावटही उमटले होते. बाजारात आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात आघाडीच्या समभागांच्या खरेदीरूपात नफेखोरी दिसली.
बाजाराचा मंगळवारचा प्रवास मात्र दोलायमानच राहिला. २७,८१४.५३ ते २७,५७०.९५ दरम्यान राहिलेल्या मुंबई निर्देशांकातील कोल इंडिया, सन फार्मा, टाटा स्टील, आयटीसी, ल्युपिन, हिंदुस्थान युनिलिव्हर आदी समभागांना मागणी राहिली. तर आयटी समभाग घसरतेच राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांत २.१ टक्क्य़ांसह आरोग्यनिगा निर्देशांक सर्वाधिक वाढीचा राहिला. तर बीएसई मिड व स्मॉल कॅपही एक टक्क्य़ाहून अधिक उंचावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian share market registering two years low level
First published on: 01-07-2015 at 06:46 IST