घसरण कायम

चालू वर्षांतील दुसऱ्या मोठय़ा आपटीतून भांडवली बाजार मंगळवारी सावरला असला तरी त्यातील नरमाई सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली.

चालू वर्षांतील दुसऱ्या मोठय़ा आपटीतून भांडवली बाजार मंगळवारी सावरला असला तरी त्यातील नरमाई सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. १३४.९१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,७०९.८७ या गेल्या महिन्याच्या तळात विसावला. तर ४४.७० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७१२.०५ वर थांबला. प्रमुख निर्देशांक आता महिन्याच्या तळात विसावले आहेत.

फेब्रुवारीमधील घसरत्या रोजगारामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत मार्चअखेरपूर्वीच व्याजदर वाढविण्याची गुंतवणूकदारांच्या मनी असलेली भीती आठवडय़ातील दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. परिणामी बाजारातील निधी ओघ आटता ठेवण्याची प्रक्रिया मंगळवारीही पार पाडली गेली. युरोपियन मध्यवर्ती बँकेने सरकारी रोखे खरेदीचा सोमवारी उशिरा जाहीर केलेला निर्णय बाजाराला मोठय़ा घसरणीपासून सावरणारा ठरला. त्यातच चालू आठवडय़ात जारी होणाऱ्या भारतातील औद्योगिक उत्पादन व महागाई दराबाबतची आशा निर्देशांकाला बडय़ा आपटीपासून रोखून ठरण्यात यशस्वी ठरली.
मुंबई शेअर बाजाराने हा टप्पा यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी अनुभवला होता. सप्ताहारंभीच सेन्सेक्स सोमवारी ६०४.१७ अंशाने घसरला होता. मंगळवारी सेन्सेक्सचा प्रवास २८,९४९ पर्यंत झेपावल्यानंतर सत्रात २८,५८४.४९ पर्यंत घसरला.
दूरसंचार ध्वनिलहरी लिलावातील सहभागी एअरटेल, आयडिया, रिलायन्स कम्युनिकेशन्सना पुन्हा मागणी येताना दिसली. तर निवडक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प वाहन समभाग फेब्रुवारीमधील विक्री जोरावर उंचावले. तर सेन्सेक्समधील एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, हिंदाल्को, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा पॉवर, एनटीपीसी, रिलायन्स, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज, सेसा स्टरलाईट, टाटा मोटर्स यांमध्ये घसरण नोंदली गेली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indices end 04 percent lower sensex down over 100 points