फेब्रुवारीमध्ये जेमतेम शून्याच्या वर ०.१ टक्का नोंद

नवी दिल्ली : औद्योगिक उत्पादनात सिंहाचा वाटा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका एकूण औद्योगिक उत्पादन दरवाढीला बसला आहे. फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादन दर शून्यावर येताना तो गेल्या तब्बल २० महिन्यांच्या तळात स्थिरावला आहे.

देशातील कंपन्यांमधून उत्पादन होणाऱ्या वस्तूंचा आलेख असलेल्या फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादन दर ०.१ टक्का नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी तो ६.९ टक्के होता. यापूर्वीचा किमान औद्योगिक उत्पादन दर जून २०१७ मध्ये ०.३ टक्के होता.

२०१८-१९ मधील एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान औद्योगिक उत्पादन दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो ४.३ टक्के होता. गेल्या वित्त वर्षांतील मार्चमधील दर येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

औद्योगिक उत्पादन दरामध्ये निर्मिती क्षेत्राचा हिस्सा ७७.६३ टक्के आहे. निर्मिती क्षेत्र फेब्रुवारी महिन्यात ०.३ टक्क्याने विस्तारले आहे. वर्षभरापूर्वी ते ८.४ टक्क्यांपर्यंत झेपावले होते. भांडवली वस्तू निर्मिती निम्म्यावर, ८.८ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे.

यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ऊर्जा क्षेत्र अवघ्या १.२ टक्क्याने वाढले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याचा प्रवास ४.५ टक्के होता. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या ०.४ टक्क्यांवरून उंचावत यंदा २ टक्के झाली आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट असलेल्या एकूण २३ उद्योग क्षेत्रापैकी १० उद्योगांनी वाढ राखली आहे. नोव्हेंबर २०१७ व ऑक्टोबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ८ टक्क्यांवर पोहोचला होता.