अर्थव्यवस्थेतील उभारीचे कोणतेही लक्षण प्रतिबिंबित करणारे औद्योगिक उत्पादन सलग तिसऱ्या महिन्यात घसरले. निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीच्या जोरावर डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन दर ०.६ टक्क्यांपर्यंत घसरले. २०१३ मधील ऑक्टोबरपासून घसरत असलेले औद्योगिक उत्पादन १.६ टक्क्यांवरून २०१३ च्या अखेरच्या महिन्यात उणे स्थितीत नोंदले आहे. याच वर्षांतील नोव्हेंबरमधील दर १.३ टक्के असा घसरणीचाच सुधारला गेला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांतील औद्योगिक उत्पादन ०.१ टक्के राहिले आहे. आधीच्या वर्षांतील याच कालावधीतील ०.७ टक्क्यांपेक्षा ते काहीसे सावरले आहे.औद्योगिक उत्पादन दरात तब्बल ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राने डिसेंबर २०१३ मध्ये १.६ टक्के घसरण राखली आहे. ग्राहकपयोगी वस्तू उत्पादनासह प्रमुख २२ पैकी ८ क्षेत्रांची कामगिरी यंदा नकारात्मक राहिली आहे. उत्पादनात १४ टक्के हिस्सा राखणाऱ्या खनिकर्म उद्योगाची वाढ किरकोळ अशा ०.४ टक्क्यांनी उंचावली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ती ३.१ टक्क्यांनी रोडावली होती. ऊर्जा निर्मितीतही यंदा ७.५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.