देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गतिमानतेचे परिमाण असलेल्या औद्योगिक उत्पादन विकासदर सरलेल्या ऑक्टोबरमध्ये १.८ टक्क्य़ांवर संकोचल्याची आकडेवारी गुरुवारी सायंकाळी जाहीर झाली. निर्मिती क्षेत्रातील मरगळीचा एकूण औद्योगिक विकासाचा घास घेतला असल्याचे पुन्हा दिसून आले.
गेल्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर २०१२ मध्ये ८.४ टक्के असा सरस विकासदर यंदाच्या वर्षांत पार रसातळाला गेल्याचे आकडेवारी स्पष्टपणे दर्शविते. एप्रिल ते ऑक्टोबर २०१३ असा सात महिन्यांत हा विकासदर १.२ टक्के असा सपाटीला गेलेला आहे.
निर्मिती क्षेत्राचा एकूण औद्योगिक उत्पादनदर निर्धारणात ७५ टक्के वाटा असून, या क्षेत्राने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ९.९ टक्क्य़ांची वाढ दाखविली होती, यंदा मात्र त्यात २ टक्क्य़ांची घट झाली आहे. निर्मिती क्षेत्रातील २२ पैकी १० उद्योगवर्गानी ऑक्टोबरमध्ये नकारार्थी प्रवास अर्थात अधोगती दर्शविली आहे. या बरोबरीने एकूण निर्देशांकात १४ टक्के योगदान असलेल्या खाणकाम क्षेत्राची सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ३.५ टक्क्य़ांनी अधोगती झाली आहे. दिलासादायी बाब म्हणजे ऊर्जानिर्मिती क्षेत्राने १.३ टक्क्य़ांनी वाढ दाखविली असून, एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत तर हे क्षेत्र ५.३ टक्क्य़ांनी विकास पावले आहे.