कर्मचारी गळतीची लागण झालेल्या देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने कंपनीतील मनुष्यबळ कायम राहावे यासाठी आयफोन ६ची अनोखी भेट देऊ केली आहे.
तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करण्याच्या निमित्ताने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी समूहातील ३००० कर्मचाऱ्यांना महागडे आयफोन६ दिले आहेत.
कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती समूहात पुन्हा आल्यानंतर इन्फोसिसमध्ये मोठय़ा पदावरील व्यक्ती सोडून जाण्याचा क्रमच सुरू होता. यामध्ये कंपनीचे अनेक सहसंस्थापकही होते. विशाल सिक्का यांच्या रूपात कंपनीने प्रथमच समूहाबाहेरचा मुख्य कार्यकारी अधिकारी निवडला. तर मूर्ती यांनीही आपल्या पुत्रासह कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून अंग काढून घेतले.
कंपनीत रुळताच सिक्का यांनी इन्फोसिस सोडून गेलेल्या पहिल्या १०० कर्मचाऱ्यांना माघारी बोलाविण्यासाठी आपल्या स्वाक्षरीचे पत्र इ-मेल केले. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचा दावाही त्यांनी यानंतर केला. शुक्रवारी स्पष्ट झालेल्या तिमाही निकालादरम्यानही कंपनीतील कर्मचारी गळती कमी झाल्याचे आवर्जून सांगण्यात आले.
कंपनीत ‘रिन्यू अॅन्ड न्यू’ धोरण अवलंबिण्यात येत असल्याचे सिक्का यांनी म्हटले आहे. कंपनीने अंतर्गत व्यवसाय रचनेत केलेल्या बदलांचाही परिणाम ग्राहकसंख्या (नवे ५९ ग्राहक) वाढण्यात आल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. तर गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे इन्फोसिस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचेही सांगण्यात आले.
कंपनीची धोरणे कर्मचारी केंद्रित असतील व त्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना येईल यासाठी दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट करताना कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (मानांकन : ए प्लस) आयफोन कंपनीचा आयफोन६ देत आहे, असे जाहीर करण्यात आले. ३००० हजार कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षांतील बोनस म्हणून ही भेट देण्यात येत आहेत.
कंपनीने आपल्या १.६५ लाख कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता मोजण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब केला असून यानुसार एक ते चार अशा श्रेणीत त्यांची विभागणी केल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी कंपनीतील कर्मचारी गळतीचे प्रमाण १२ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर गेले होते. ते जून २०१५ पर्यंत पुन्हा १५ टक्क्यांवर आणण्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला.
इन्फोसिसकडून नवोन्मेषाचे ‘रिन्यू अॅन्ड न्यू’ धोरण अवलंबिण्यात येत आहे. कंपनीने अंतर्गत व्यवसाय रचनेत केलेल्या बदलांचाही परिणाम ग्राहकसंख्या (नवीन ५९ ग्राहक) वाढण्यात दिसून येत आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे इन्फोसिस सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे..
-विशाल सिक्का, मुख्य कार्यकारी अधिकारी, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लि.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिमाही निकालात नफ्यात किरकोळ वाढ
तिमाही निकालांच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या इन्फोसिसचे चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जारी करण्यात आले. एरवीपेक्षा काही दिवस आधी व भांडवली बाजाराच्या व्यवहार वेळेत ते जारी करणाऱ्या या कंपनीने डिसेंबरअखेर ३,२५० कोटी रुपयांचा करोत्तर नफा मिळविला आहे. गेल्या तिमाहीपेक्षा तो अवघा ५ टक्केअधिक आहे. तर भारतासह उत्तर अमेरिकेत अधिक ग्राहकसंख्या मिळाल्याच्या जोरावर कंपनीने ढोबळ नफ्यात १३ टक्केवाढ नोंदविली आहे.
समभागाची ३% उसळी
सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागाला १,९८५ रुपयांचा भाव मिळाला. व्यवहारात निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याचे मूल्य १,९१४ रुपयांपर्यंत घसरले. मात्र निकाल स्पष्ट होताच समभागाने थेट २,१०८ रुपयांपर्यंत उसळी घेतली. सत्रअखेर तो गुरुवारच्या तुलनेत पाच टक्क्यांनी उंचावून २,०७३.६० रुपयांवर स्थिरावला. त्याचबरोबर टीसीएसही २.८० टक्क्यांनी वाढला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys gifts 3000 employees iphone6 as holiday bonus
First published on: 10-01-2015 at 01:35 IST