विस्तीर्ण समुद्र किनारा आणि बंदर संसाधने लाभलेल्या भारतासारख्या देशात सागरी व्यापार क्षेत्रात उपलब्ध अमाप संधींचा ऊहापोह करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील अग्रणी, धोरणकर्ते आणि देशी व आंतरराष्ट्रीय ४० तज्ज्ञ एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. आजच्या घडीला ९० टक्के जागतिक व्यापार दळणवळणासाठी अवलंबून असलेल्या या महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्राच्या भविष्यातील प्रगतीबाबत चर्चेसाठी ‘इन्मेक्स इंडिया २०१३’ परिषद येत्या मंगळवार, ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव (पूर्व) येथे योजण्यात आली आहे. नौकानयन क्षेत्रातील कंपन्या, जहाज बांधणी/ जहाज बंधारे कंपन्या, बंदरे (सार्वजनिक व खासगी), नौदल, ऑफशोअर व तेल कंपन्या, उपकरण निर्माते, तटरक्षक, ड्रेजिंग कंपन्या, सागरी प्रशिक्षण व सेवा क्षेत्रातील संस्था, सरकारी संस्थांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी आणि मनुष्यबळ पुरवठादार संस्थांच्या प्रतिनिधी परिषदेच्या वेगवेगळ्या चर्चात्मक सत्रांमध्ये सहभागी होत आहेत. परिषदेच्या बरोबरीनेच ‘इन्फॉर्मा एक्झिबिशन्स’द्वारे सागरी क्षेत्रात वापरात येणाऱ्या विविध उपकरणे, उत्पादने यांचे प्रदर्शन व तंत्र-तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही या निमित्ताने जनसामान्यांना पाहण्यासाठी खुले केले आहे.