बाजारपेठेत गुंतवणुकीकरिता म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रोखे, डिबेंचर्स वगैरे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनंत काळापासून भारतामध्ये सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पारंपरिकरीत्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे परतावे उच्च असतात आणि त्यामुळेच सोन्याला गुंतवणूकदारांचे प्रथम प्राधान्य मिळत असते. जरी सरकारचा अलीकडे या संबंधाने नकारात्मक कल बनला असला तरी लोक वाढत्या संख्येने गुंतवणुकीकरिता मौल्यवान धातूंचा पर्याय निवडत असल्याचे लक्षात आले आहे. पण नुकताच हा कल बदलत चालल्याचे चित्र दिसत आहे. गुंतवणूकदारांकडून आता हिऱ्यांना जास्त प्राधान्य दिले जात आहे.
हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करण्याची प्राथमिक पद्धत म्हणजे प्रत्यक्ष जाऊन हिरा विकत घेऊन येणे किंवा एखाद्या दागिन्याचा भाग म्हणून हिरा विकत घेणे. महागाईविरुद्ध तुलनेने खूपच सुरक्षित पर्याय आणि कमी देखरेख करावी लागणारी ही गुंतवणूक असल्याने गुंतवणूकदार हिऱ्याच्या खरेदीला पसंती देऊ लागलेले आहेत. गुंतवणूक भांडारात वैविध्यता आणू पाहणाऱ्यांसाठी हिरेदेखील अतिशय सक्षम गुंतवणूक पर्याय ठरू लागले आहेत.
तथापि हिरे खरेदी करताना पूर्ण खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. गुंतवणूकदाराने तज्ज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेणे आणि हिरा विकत घेण्याचा अंतिम निर्णय घेताना त्यावर विश्वसनीय स्रोताकडून मिळालेले प्रमाणन आहे की नाही याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांची कमी दर्जाच्या हिऱ्यांतून होणारी फसवणूक टाळण्याकरिता डिव्हाइन सॉलिटेयर्ससारख्या ब्रँड्सनी लॅबोरेटरी सर्टििफकेट्सच्या पल्याड सुरक्षा पुरवणे आणि पर्यायाने ग्राहकाकरिता हिरे खरेदी अधिक सोपी करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
भारतात अलीकडे सोन्यात गुंतवणूक करणे हे गुंतागुंतीचे ठरू लागलेले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक चढउतार झालेले दिसून आलेले आहेत आणि त्याचा परिणाम एक गुंतवणूक पर्याय म्हणून असलेल्या विश्वसनीयतेवर झाला आहे. रुपयाची घसरण होत असल्याने लोक सोन्यात गुंतवणूक करणे टाळत आहेत. सोन्याचा थेट संबंध जागतिक अर्थव्यवस्थेशी असतो. अर्थव्यवस्थेतील घसरण म्हणजे सोन्यातील घसरण. सोन्याच्या किमतीदेखील बहुतांशी सट्टेबाजांवरच अवलंबून असतात.
उलटपक्षी उत्तम परतावे देणाऱ्याआणि फॅशनच्या बाबतीतही तोडीस तोड असणाऱ्या सॉलिटेयर हिऱ्यांना एक आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून प्राधान्य मिळू लागले आहे. सॉलिटेयर हिऱ्यांशी भावनिक आणि संवेदनशील नाते जोडले गेलेले असते. आज, अधिकाधिक लोक सॉलिटेयर हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. सॉलिटेयर हिऱ्यांची किंमत ही सोन्याच्या बाबतीतील सट्टेबाजांमार्फत नव्हे तर प्रत्यक्ष मागणी-पुरवठय़ाने ठरत असते. हिऱ्यांच्या किमतींना बाजारपेठेतील सद्य सांख्यिकीचे पाठबळ लाभलेले असून त्याचे मूल्य आाणि किंमत सातत्याने वाढतच असते.
हिऱ्यांना आता सोन्याचे दुबळे भाऊबंद म्हणून हिणवले जात नाही आणि हा दृष्टिकोन इतर गोष्टींनाही पूरक ठरावा. जर एखाद्याने तीन वर्षांपूर्वी हिऱ्यात, सोन्यात आणि स्टॉक्समध्ये प्रत्येकी १०० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्यांची किंमत सद्य घडीला स्टॉक्सच्या बाबतीत १२० रुपये, सोन्याच्या बाबतीत १८१ रुपयांच्या जवळपास आणि हिऱ्यांच्या बाबतीत १९० रुपयांच्या आसपास आहे (खालील कोष्टक पाहा) आणि त्यात भविष्यातही वाढ होत राहण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील असे कल पाहता गुंतवणूकदार दीर्घकाळाकरिता सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक म्हणून हिऱ्यांचा विचार करू लागले आहेत.
२० लाखांच्या सोन्याचे दागिने घालून कोणीही रस्त्यावर फिरू शकत नाही, पण २० लाख किंवा त्याहून जास्त किमतीचे हिरे घालून तुम्ही रस्त्यावर सहज फिरू शकता. ते दिसायलाही देखणे असतात, अभिजात वाटतात, प्रतिष्ठेचे लक्षण असतात आणि भपकेबाज नसून नाजूक असतात. हिरे हा असा गुंतवणूक पर्याय आहे ज्याचा वापरही करता येतो आणि गुंतवणूकही करता येते. सोन्याचे तसे नसते, बहुतेक लोक आपले सोने लॉकर्समध्ये ठेवतात.
सॉलिटेयर हिऱ्यांचे दागिने आणि सर्वसाधारण दागिने यांत फरक काय?
सॉलिटेयर हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये हिरा हा दागिन्यातील अतिमहत्त्वाचा व मौल्यवान घटक असतो. तो फक्त दागिन्यांची शोभा वृद्धिंगत करण्याकरिता वापरला जात नाही तर त्याला कोंदण म्हणून तो दागिना बनवण्यात येतो. उलटपक्षी, सर्वसाधारण हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये हिऱ्याचा वापर दागिन्याची शोभा वाढवण्याकरिता केलेला असतो. सर्वसाधारण हिऱ्यांच्या दागिन्यात अनेक छोटे हिरे वापरलेले असतात. दर्जा, किमतीतील पारदर्शकता, प्रमाणपत्र, पुनर्खरेदी आणि अद्ययावत किंमत धोरण, डिझाइन्स- वापर वैविध्य व सहजता अशा सर्वागाने त्याचे वेगळेपण अधोरेखित होते.
(लेखक डिव्हाइन सॉलिटेयर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक)