राजीव गांधी ईक्विटी सेव्हिंग्स योजनेच्या अंतर्गत ज्या कंपनींचे शेअर्स आपण खरेदी करू इच्छितो त्या कशा निवडाव्या, अशी विचारणा वारंवार होत असते. वस्तुत: गुंतवणूकविषयक सल्ला देणे हे माझे कार्यक्षेत्र नाही. तथापि ५०,००० रुपये या योजनेत गुंतवायचे आहेत तर ते कशा प्रकारे करता येतील याचे ढोबळ उदाहरण म्हणून आदित्य मेहता यांचेकडून एक तक्ता हाती आला. अर्थात या पलिकडे जाऊन आपण त्यात हवे ते बदल करू शकतो. १८ कंपनींचे एक किंवा दोन शेअर्स घेऊन विविध क्षेत्रात गुंतवणूक झालेली यात दिसून आले. अर्थात या १८ कंपन्यांच्या एका ‘बास्केट’ची (टोपली) किंमत ८,५२६ रुपये झाली. अशा सहा ‘बास्केट’ घेतल्या की ५१,००० रुपयाची गुंतवणूक झाली.
दोन महिन्यापूर्वी बीएसईबाबत माहिती लिहिली होती ती आवडल्याचे अनेक वाचकानी आवर्जून कळवले. तसेच त्यानंतर जे काही बदल झाले किंवा नवीन प्रणाली अस्तित्वात आल्या त्याची माहिती देण्याची विनंती अनेकानी केली. जागतिक शेअर बाजारांच्या तुलनेत कुठेही उणे नसलेल्या बीएसईमध्ये क्रमाक्रमाने आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर सुरू झाला. मुंबईपुरती असलेली बीएसईची कार्यकक्षा रुंदावली.
१९९७ मध्ये बोल्ट  (BSE On Line Trading) यंत्रणा देशभर कार्यावित झाली  व देशभर बीएसईचे ब्रोकर व्यवसाय करू लागले. २१ सप्टेंबर २०१० रोजी मोबाईल ट्रेडिंग सुरू झाले ते इथेच. ज्यामुळे शेअर दलालाच्या कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. म्युच्युअल फंडाचे युनिट्स इतकेच नाही तर सोनेदेखील आता डिमॅट खात्यात ठेवण्याची सोय बीएसईने उपलब्ध करून दिली आहे ती आपल्या सीडीएसएल या डिपॉझिटरीमार्फत.
म्हणजे सोन्याचे दागिने, करणावळ वगैरे चोरीला जायचा धोका वगरे सर्वच टळले. अगदी एक ग्रॅम सोने देखील ठेवता येते या डिमॅट खात्यात! आता ट्रेड झाला रे झाला की स्टॉक एक्सचेंज गुंतवणूकदाराला स्वत:च्या डेटाबेसमधून एसएमएस पाठवते. त्यामुळे आपण न सांगता दलालाने शेअर्स विकले किंवा खरेदी केले की काही तासात आपल्याला ते कळते. एप्रिल २००३ मध्ये क्रांतिकारी अशी टी+२ प्रणाली सुरू झाली. ऑगस्ट २००५ मध्ये कॉर्पोरेट बॉडी म्हणून बीएसई रूपांतर झाले.
जुल १९८७ मध्ये इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडाद्वारे गुंतवणूकदारांना पाठबळ मिळाले. मे १९९७ मध्ये ट्रेड गॅरंटी फंडाची सुरुवात झाली. जेणेकरून दलाल मंडळीना संरक्षण मिळाले. ऑक्टोबर २००९ मध्ये ट्रेड बाबतचा तपशील देणारी सुविधा, डिसेंबर २००९ मध्ये मराठी संकेतस्थळाचे उद्घाटन, जानेवारी २०१० मध्ये सकाळी ९ ते ३.३० अशी विस्तारीत वेळ .
इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडामार्फत प्रत्येक गुंतवणूकदाराला १५ लाख रुपये संरक्षण बीएसई देते. याचा अर्थ असा नाही की गुंतवणूकदाराने शेअर बाजारात व्यवहार करत रहावेत आणि त्यातून जर त्याला नुकसान झाले तर १५ लाख रुपयापर्यंत भरपाई बीएसई करून देईल.
एका श्रोत्याने वरील प्रमाणे आपली समजूत असल्याचे सांगितल्याने हा खुलासा करीत आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे असा हा विषय नव्हे. स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत दलालामार्फत व्यवहार करताना दलाल  आíथक बाजूने नादार झाला तर अशा वेळी संरक्षण देण्यासाठी हा फंड आहे.
‘परमिटेड सेक्युरिटीज’ म्हणजे काय असा प्रश्न सुयश प्रभुदेसाई यानी केला आहे. एखादी कंपनी समजा कलकत्ता स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असेल पण बीएसईमध्ये नसेल; तरीदेखील त्या कंपनीचे शेअर्स बीएसईवर खरेदी/विक्री करता येतील अशी व्यवस्था बीएसईने केली असेल तर त्याला ‘परमिटेड सेक्युरिटीज’ असे म्हणतात.
अर्थात गुंतवणूकदारांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था काही ठराविक कंपनींच्या बाबतीत केलेली असते.